ओडी सर्वेसाठी महापालिका घेणार वाहतुक पोलिसांची मदत
पनवेल शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांच्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून, विकास आराखडा, वाहतूकीशी संबधित प्राथमिक दस्तऐवज वापरून या सर्वेक्षणाला सुरूवात केली गेली आहे. या अंतर्गत ओडी अर्थात ओरीजीन डेस्टीनेशन सर्वेला सुरूवात होणार आहे. यासाठी वाहतुक पोलिसांची मदत पालिका घेणार आहे. या उद्देशाने आज आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पुरूषोत्तम कराड आणि वाहतूक पोलिस निरीक्षक पनवेलचे संजय नाळे यांच्यांशी चर्चा केली. वाहतूकीशी निगडीत विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता सजंय कटेकर उपस्थित होते.
पनवेल शहराची व्यापक वाहतूक योजना आणि पार्किंग धोरण तयार करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका हद्दीत सर्वेक्षण सुरू झाले आहे. या अंतर्गतच ओडी सर्वे होणार असून सोळा तास हा सर्वे पनवेल शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरती होणार आहे. या दरम्यान वाहतूक कोंडी न होता सुरळित वाहतूक व्हावी यासाठी आज आयुक्तांनी वाहतूक उपायुक्तांशी चर्चा केली.
त्याचबरोबर पनवेल शहराला स्वत:ची वाहतूक पोलिस चौकी उभारण्यासाठी जागा निर्माण करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
तसेच कळंबोली सर्कलवरती होणारी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या मध्यस्थीने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याच्या विषयावर यावेळी चर्चा झाली .