आवश्यक व तात्काळ कामासाठी परदेशी जाणा-या नागरिकांकरिता विशेष लसीकरण सुविधा
परदेशी जाणा-या नागरिकांनी कोव्हीशील्ड लसीचा डोस घेणे आवश्यक असून सद्यस्थितीत कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 12 ते 16 आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस देण्यात येत आहे. परंतु नोकरी, शिक्षण याकरिता परदेशी जाणे आवश्यक असलेल्या अनेक नागरिकांनी दुसरा डोस लवकर मिळावा यासाठी शासनाकडे विनंती केल्यानुसार आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस हा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर देण्याबाबत शासकीय स्तरावरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये, परदेशात शिक्षणाकरिता, कामाकरिता व नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेस जाण्याकरिता लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार 16 जूनपासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत शिक्षण, नोकरी व टोकिओ ऑलिम्पिककरिता परदेशी जाणा-या 1655 नागरिकांना कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्यात आलेला आहे.
यामध्ये सुधारणा करीत शासनाच्या वतीने दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिक्षण व कामासोबतच अत्यंत अत्यावश्यक कामानिमित्त परदेशी जावयाचे असल्यास दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या धर्तीवर परदेशात वैद्यकीय उपचारासाठी जाणे आवश्यक असल्यास, परदेशात जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असल्यास, मुलगा परदेशात असल्याने आई, वडीलांना परदेशात जाणे आवश्यक असल्यास – अशा प्रकारच्या फक्त तात्काळ कामासाठी परदेशी जावयाचे असल्यास आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून त्यांस कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाले असल्यास दुसरा डोस दिला जात आहे.
त्यानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांपैकी शिक्षणाकरिता परदेशात जाणारे विद्यार्थी, कामासाठी परदेशात जाणा-या व्यक्ती तसेच अत्यंत तात्काळ कामासाठी परदेशात जाणा-या व्यक्ती यांना कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस पूर्ण झाले असल्यास दुसरा डोस देण्यात येत आहे.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फीथिएटर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये सदर व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रहात असल्याचे आधारकार्ड, भाडेकरार, इलेक्ट्रीसिटी बिल, पासपोर्ट इत्यादी रहिवास पुरावा असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे परदेशात शिक्षणासाठी वा नोकरीसाठी निवड झाल्याची कागदपत्रे, अत्यावश्यक कारणासाठी जावयाची कागदपत्रे, पासपोर्ट, व्हिसा, पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती लाभार्थ्याने स्वाक्षांकित करावयाच्या आहेत.
सदर कागदपत्रांची मुख्यालयात तपासणी करण्यात येत असून त्यावर कोव्हीड 19 लसीकरण मोहीमेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी कागदपत्रे योग्य असल्याचे प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे लसीकऱण करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात 63 लाभार्थ्यांनी या विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला असून 16 जूनपासून आत्तापर्यंत विविध महत्वाच्या कामांसाठी परदेशी जाणा-या एकूण 1718 नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेतला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यावर भर देण्यात येत आहे. आत्तापर्यंत 9,50,888 नागरिकांनी म्हणजेच 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच 4,10,734 नागरिकांनी म्हणजेच 39 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
तरी अत्यावश्यक कामांसाठी परदेशी जाणा–या नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणा-या या विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.