नवी मुंबई

रुग्णालयीन नियोजनाकरिता आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची आरोग्यविषयक विशेष बैठक

कोव्हीडच्या तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना दुस-या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरुळ व ऐरोली रुग्णालये कोव्हीड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे. याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज विशेष बैठक आयोजित करत कोव्हीड व नॉन कोव्हीड वैद्यकीय सुविधांच्या नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक व बेलापूर, तुर्भे रुग्णालयांचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

नेरुळ व ऐरोली या रूग्णालयांचे कोव्हीड रूग्णालयामध्ये रुपांतरण करताना सर्वसाधारण रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळताना कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देत आयुक्तांनी याठिकाणी सद्यस्थितीत दिल्या जात असलेल्या आयपीडी व ओपीडी सेवांची मजलानिहाय सविस्तर माहिती घेतली. सध्या नेरुळ येथील मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय इमारतीत सर्वात वरच्या सहाव्या व सातव्या मजल्यावर तसेच ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात पाचव्या व चौथ्या मजल्यावर कोव्हीड रुग्णालयाकरिता आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्स कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर खालील मजल्यांवर सद्यस्थितीत कार्यरत असणा-या आयपीडी व ओपीडी सेवा वरील मजल्यांवर स्थलांतरीत करून तेथे कोव्हीड रुग्णालय रुपांतरणाचे काम सुरु करावे व ते जलद करण्याच्या दृष्टीने कामावर बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश आयुक्तांनी वैद्यकीय अधिक्षक यांना दिले.

याच कालावधीत बेलापूर व तुर्भे येथील माताबाल रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्याची कामेही समांतर सुरु ठेवावीत व ती तत्परतेने पूर्ण करून घेण्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी पाठपुरावा करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

नेरुळ व ऐरोली रुग्णालयाचे कोव्हीड रुग्णालयांमध्ये रुपांतरण करताना जोपर्यंत त्याठिकाणी कोव्हीड रुग्ण दाखल होत नाहीत तोपर्यंत सर्वसाधारण रुग्णांना वैद्यकिय सेवा देण्याकरिता ही रुग्णालये कार्यरत राहतील असे आयु्क्तांनी स्पष्ट निर्देश दिले. या दोन्ही रुग्णालयांच्या इमारती प्रशस्त असून याठिकाणी सुरु असलेल्या काही आयपीडी व ओपीडी सेवा सर्वसाधारण रुग्णांसाठी तशाच उपलब्ध ठेवणेबाबत या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

नेरुळ रुग्णालय कोव्हीडमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर बेलापूर माता बाल रुग्णालयातील कोव्हीड पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती विषयक वैद्यकीय सुविधा नेरुळ रुग्णालयात स्थलांतरीत करून बेलापूर रुग्णालयामध्ये पूर्णपणे सर्वसाधारण प्रसूती सुविधा उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ऐरोली रूग्णालयामध्ये कोव्हीड उपचार सुविधेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन वेगळ्या भागात नॉन कोव्हीड प्रसूतीपूर्व तपासणी व प्रसूतीपश्चात उपचार सुविधा कायम सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील डायलेसीस सुविधेचे विस्तारीकरण करून नेरुळ रुग्णालयातील डायलेसीस सुविधा कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण रुग्णांसाठी डायलेसीस सुविधेच्या इतर पर्यायांचाही विचार करण्यात आला.

सद्यस्थितीत सिडको एक्झिबिशन सेंटरमधील 75 आयसीयू बेड्स सुविधेमध्ये 23 व एमजीएम रुग्णालय कामोठे येथील 100 आयसीयू बेड्स कक्षामध्ये 4 रुग्ण दाखल असून भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास नेरुळ व ऐरोली रुग्णालयांमध्ये तीव्र लक्षणे असणारे कोव्हीड रुग्ण दाखल करण्यात येणार आहेत. तोपर्यंत ही रुग्णालये सर्वसाधारण रुग्णांना सेवा पुरविणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेची नेरुळ व ऐरोली ही दोन्ही रुग्णालये आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्ससह कोव्हीड विरोधी लढ्याकरिता सज्ज होत असून कोव्हीड कालावधीनंतर या रुग्णालयांचा उपयोग दर्जेदार उपचाराकरिता होणार असल्याने याव्दारे आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button