पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोल्हापूरला मदतकार्य तसेच महाडला वैद्यकीय पथक रवाना
अतिवृष्टीमुळे उसळलेल्या जलप्रलयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच 2 मदतकार्य पथकांतून 65 हून अधिक अधिकारी, स्वयंसेवक महाडला तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफसह 15 सदस्यांचे वैद्यकीय पथक चिपळूणमध्ये पोहचलेले असून तेथील स्थानिक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मदतकार्याला सुरूवातही केलेली आहे.
याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर भागातून आलेल्या शासकीय मागणीस अनुसरून स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे तसेच स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष देवरस व श्री. पारकर यांच्या सोबत 40 स्वयंसेवकांचे एक मदतकार्य पथक 26 जुलै रोजी सायंकाळी कोल्हापूरकडे रवाना झालेले आहे. या पथकासह सर्व मदतकार्य सामुग्री तसेच कार्बोलिक पावडर, ब्लिचींग पावडर अशी जंतुनाशके आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड व स्प्रेईंग पम्पस देण्यात आलेले आहेत.
अशाच प्रकारे डॉ, सोनल बन्सल यांच्या नियंत्रणाखाली 8 डॉक्टरांसह 24 जणांचे वैद्यकीय पथक आवश्यक औषधांच्या साठ्यासह दि. 27 जुलै रोजी सकाळी 9 वा. महाडकडे रवाना झालेले आहे. ज्याप्रमाणे पूरग्रस्त भागातील स्थानिक प्राधिकरणाकडून मागणी येत आहे त्याप्रमाणे आवश्यक साधनसामुग्रीसह मदतकार्य पथके पाठविण्यात येत असून या सर्व बाबींकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत.