डेंग्यू नियंत्रणासाठी ॲक्शन मोडमध्ये काम करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश
सध्या एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना ॲक्शन मोडमध्ये येण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, वाशी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे हे समिती सभागृहात तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी वेबसंवादाव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.
डेंग्यूचा संशयित रूग्ण आढळला की त्या घरासह त्या परिसरातील 100 घरांचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते ती अधिक प्रभावीपणे राबविण्यास तत्परतेने सुरूवात करावी असे निर्देश देत त्याठिकाणी अधिक बारकाईने डास उत्पत्ती स्थानांचा शोध घ्यावा व ती त्वरित नष्ट करण्याची कार्यवाही करावी तसेच डासनाशक फवारणी करण्याची कार्यवाही देखील अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कोव्हीडच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी ज्याप्रमाणे रूग्ण सापडेल त्याठिकाणी हॉटस्पॉट निश्चित करून लक्ष केंद्रीत केले जाते, त्याचप्रमाणे डेंग्यूचा संशयित रूग्ण जरी आढळला तरी त्या भागाकडे लक्ष केंद्रीत करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. ज्या भागात जास्त केसेस त्याठिकाणी डासउत्पत्ती शोध मोहीम तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
डेंग्यूच्या दृष्टीने जुलै ते नोव्हेंबर हा सर्वसाधारणपणे रूग्णवाढीचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त करीत नागरी आरोग्य केंद्रांच्या वतीने घरोघरी राबविण्यात येणा-या डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीमांना अधिक गती देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. विशेषत्वाने ज्याठिकाणी बांधकामे सुरू आहेत अशा साईट्सवर विशेष लक्ष देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी बांधकाम साईट्सच्या माहितीकरिता विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत अभियंत्याची मदत घेण्यास सांगितले.
डेंग्यूचा संशयित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्यावर योग्य वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असून त्यादृष्टीने नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच वाशी रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी परस्पर समन्वय राखून काळजी घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
डेंग्यूचा प्रसार हा मादी एडीस इजिप्ती डांसापासून होत असून ती स्वच्छ पाण्यात अंडी घालते आणि डास उत्पत्ती होते. सर्वसाधारणपणे नागरिकांची पाणी साठवून ठेवण्याची सवय लक्षात घेऊन त्यांनी अशाप्रकारे पाणी साठवून ठेवू नये अशा संदेशाचा प्रसार करावा तसेच पाणी साठवून ठेवले तरी ते उघडे ठेवू नये, तर झाकून ठेवावे याविषयी अधिक व्यापक जनजागृती करावी असे आयुक्तांनी निर्देश केले. आठवड्यातून एक दिवस सर्व भांडी कोरडी करून कोरडा दिवस साजरा करावा याबाबतही नागरिकांना प्रोत्साहीत करणेविषयी त्यांनी सूचना केल्या.
काही मोठ्या गृहसंकुलांमध्ये महानगरपालिकेचे ओळखपत्र दाखवून व शोध मोहीमेचे महत्व पटवून सांगूनही डासउत्पत्ती शोध मोहीमेसाठी प्रवेश दिला जात नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी मांडलेल्या या अडचणींविषयी भाष्य करताना अशा सोसायट्यांवर विभाग कार्यालयांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
जानेवारीपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यूचे 8 रूग्ण आढळले असून आगामी दोन महिने हे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी संशयित रूग्ण जरी आढळला तरी गंभीरतेने त्या भागातील सर्वेक्षणावर भर द्यावा व कोव्हीडप्रमाणेच डेंग्यूबाबत घ्यावयाच्या काळजीविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी असे सूचित केले. नियमितपणे संध्याकाळी होणा-या वैद्यकीय अधिकारी यांच्या वेब बैठकीमध्ये याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी डेंग्यूचा धोका ओळखून आपल्या घरामध्ये तसेच घराभोवती पाणी साचून त्यामध्ये डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. घरामधील फुलदाण्या, कुंड्यांखालचे व फ्रिज डिफ्रॉस्ट ट्रे, एसी डक्ट, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी नियमित बदलावे, भंगार साहित्य व टायर्स योग्य प्रकारे नष्ट करावेत, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात तसेच आठवड्यातून एकदा स्वच्छ करून पूर्ण कोरड्या कराव्यात अशाप्रकारे काळजी घ्यावी. तसेच डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी अथवा रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी व फवारणीसाठी घर, सोसायटी व परिसरात येणा-या महापालिका कर्मचा-यांना सहकार्य करावे आणि मलेरिया, डेंग्यू अथवा इतर साथरोगांची लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात जाऊन त्वरित मोफत उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.