कोरोनाग्रस्तांसाठी काँग्रेसची रिलायन्सकडे धाव
कोरोना महामारीचा नवी मुंबई शहरामध्ये उद्रेक पाहता सर्वसामान्यांनाही रिलायन्स रूग्णालयात तातडीने उपचार मिळावेत, त्यांना कोणतेही अडथळे येवू नये यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्र्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत कोपरखैरणेतील रिलायन्स रूग्णालयात जावून तेथील व्यवस्थापणाशी चर्चा केली व व्यवस्थापणानेही काँग्रेस शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. नवी मुंबईतील सर्वच रूग्णालयांना भेटी देवून कोरोनाग्रस्तांना प्रवेशासाठी तसेच उपचारासाठी अडथळे येत आहेत अथवा नाहीत याची खातरजमा करणार
असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी दिली.
रिलायन्स व्यवस्थापणाशी चर्चा करताना कोरोनाचे दुसरे पर्व सुरू असून कोरोना महामारीचा उद्रेक झालेला आहे. या काळात कोरोना झालेल्या रूग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागातील सर्वच जण अथक प्रयत्न करत आहेत. कोरोना रूग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी काँग्रेसकडून गेली सव्वा वर्ष सातत्याने अथक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रूग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी काँग्रेसकडून हेल्पलाईनही नेरूळमधील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेले आहेत. आपल्या रूग्णालयात कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी प्रवेशाबाबत कोणाशी संपर्क करावा याबाबत रूग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व संपर्कध्वनी क्रमांक देण्यात यावा. तसेच कोरोना रूग्णांना उपचाराबाबत आपल्या रूग्णालयात कोणताही त्रास होवू नये, त्यांच्यावर वाजवी दरात उपचार व्हावेत, कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अन्य कोरोना रूग्णांना उपचारासाठी आपल्याच रूग्णालयाची शिफारस करावी असे आपले कार्य असावे इतकीच आपणाकडून माफक अपेक्षा आहे. कोरोना रूग्णांची बिलापायी आर्थिक लुटमार, तसेच सुविधा देताना रूग्णांची होत असलेली हेळसांड अशा कोणत्याही तक्रारी आपल्या रूग्णालयाच्या नावे येवू नयेत. कोरोना पर्वात कोरोना रूग्णावर उपचारासाठी आम्हाला आपणाकडून सहकार्य अपेक्षित आहे. आपण आम्हाला सहकार्य करावे, आम्ही आपणास सहकार्य करू. आपण काँग्रेसच्या हेल्पलाईनबाबत आपल्या रूग्णालयातील संबंधित अधिकारी व त्यांचा संपर्क क्रमांक देण्यात यावा अशी मागणी चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी रिलायन्स व्यवस्थापणाकडे केली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रूग्णालयाच्या भेटीप्रमाणे नवी मुंबईतील सर्वच रूग्णालयांना भेटी देवून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी काँग्रेसकडून अथक प्रयत्न केले जाणार असल्याचे रवींद्र सावंत यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसकडून संतोष शेट्टी, रवींद्र सावंत यांनी तर रिलायन्सकडून डॉ. बिपिन चेवले यांनी या चर्चेत सहभागी होत कोरोना, कोरोना रूग्णांची वाढती संख्या, उपचारासाठी प्रवेशप्रक्रिया, आयसीयू, ऑक्सिजन बेड, विविध इंजेक्शन आदी सर्वच मुद्द्यांवर चर्चा केली.