18 वर्षावरील नागरीकांकरिता शासकिय संस्थांमध्ये मोफत प्रिकॉशन डोस उपलब्ध
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षावरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्टपूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची महानगरपालिका ठरली. लहान मुलांच्या लसीकरणाकडेही महानगरपालिकेने तशाच प्रकारे काटेकोर लक्ष देत 100 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट नजरसमोर ठेवले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस यामधील 9 महिने किंवा 39 आठवडे हे अंतर आता कमी करण्यात आले असून दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. प्रिकॉशन डोसचा लाभ कालावधी कमी केल्याने आता 3 महिने अगोदर घेता येणार असल्याने कोव्हीड लसीकरणाला अधिक गती मिळणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि. 15 जुलै 2022 पासुन नमुंमपा कार्यक्षेत्रात कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सव सुरु होत आहे. सदर महोत्सवाच्या जन अभियान अंतर्गत 18 वर्षावरील सर्व नागरिकांना दि. 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांच्या कालावधीत सर्व शासकिय लसीकरण केंद्रामध्ये प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पुर्ण झाले असतील अशा सर्व लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार येईल.
आत्तापर्यंत 13 लाख 81 हजार 281 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 36 हजार 986 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 1 लाख 1 हजार 317 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.
लाभार्थी | पहिला डोस | दुसरा डोस | प्रिकॉशन डोस |
आरोग्य कर्मी (HCW) | 34510 | 23104 | 10148 |
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) | 30833 | 22106 | 10309 |
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक | 100250 | 101489 | 40958 |
45 ते 60 वयोगटातील नागरिक | 245422 | 236029 | 39902(18 ते 59 वयोगट) |
18 ते 45 वयोगटातील नागरिक | 844720 | 75046 | – |
15 ते 18 वयोगटातील नागरिक | 81721 | 66160 | – |
12 ते 14 वयोगटातील नागरिक | 43775 | 33052 | – |
कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत मोफत प्रिकॉशन डोस मिळण्याची सोय नवी मुंबई महानगरपालिकेचे 5 रुग्णालये सा.रु.वाशी, नेरुळ, ऐरोली, व माता बाल रुग्णालय बेलापुर आणि तुर्भे, 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ESIS रुग्णालयात करण्यात आली आहे. कोव्हिडपासुन लवकरात लवकर संरक्षित करून घेणे गरजेचे असून नागरिकांनी प्रिकॉशन डोसचे मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.