नवी मुंबई

फ्लेमिंगो (रोहित पक्षी)

सीवूड्स येथे आपणास मोठ्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित पक्षी) पहाता येतील. वरील फोटो हे सीवूड्स येथील आहेत.

फ्लेमिंगो हा एक पान पक्षी आहे ज्याला मराठी मध्ये रोहित पक्षी असे म्हणतात. या पक्ष्याला हंसक असेही म्हणतात. जगात सर्वत्र रोहित पक्ष्याच्या सहा जाती आहेत. भारतात मोठा रोहित (फि. रोझियस) आणि लहान रोहित (फि. मायनर) या दोन जाती आढळतात.

मोठा रोहित (फि. रोझियस) दिसायला आकर्षक असून त्याची उंची ११०–१५० सेंमी. आणि वजन २–४ किग्रॅ. असते. शरीराचा रंग गुलाबी पांढरा असतो. पाय लांब, काटकुळे आणि गुलाबी असतात. मान उंच व नागमोडी असते. चोच गुलाबी व जाडसर असून मधेच पिळवटल्यासारखी दिसते. शेपूट आखूड असते. रोहित नेहमी एकाच पायावर उभा राहिलेला दिसतो. तसेच लहान रोहितची (फि. मायनर) ही आकारमानाने सर्वांत लहान असलेली जाती आढळते. ही जाती उंचीला ८०–९० सेंमी. असून वजन १·२- २·७ किग्रॅ. असते. शरीराचा बहुतेक भाग गुलाबी- पांढुरका असतो. लहान रोहित आणि मोठा रोहित यांच्यातील ठळक फरक असा की लहान रोहितच्या चोचीचा बराचसा भाग काळा असतो. अन्यथा दोन्ही जाती एकत्र असल्यास त्यांच्यामधील फरक सहज लक्षात येत नाही. लहान रोहितच्या थव्यात सर्वाधिक संख्येने पक्षी असतात.

रोहित पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे व खाडी अशा परिसंस्थेतच थव्याने आढळतात. चोचीच्या विशिष्ट रचनेमुळे तो डोके, चोच संपूर्णपणे पाण्यात बुडवून पाण्यातील तसेच चिखलातील खाद्य गाळून घेतो. स्पिरुलिना शैवाल, पाणवनस्पती, बिया, डिंभ, पाणकीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे व शिंपले हे त्याचे मुख्य खाद्य आहे.

रोहित पक्षी समाजप्रिय आहे. त्यांच्या वसाहतीत हजारो पक्षी असतात. या मोठ्या आकाराच्या वसाहतींमुळे त्यांचे भक्षकांपासून रक्षण, अन्नाचा पुरेपूर वापर आणि घरटी बांधण्यासाठी कमी उपलब्ध असलेल्या जागेचा कार्यक्षम वापर ही उद्दिष्टे साध्य होतात. विणीचा हंगाम सुरू होण्याआधी या वसाहतींमध्ये १५–५० पक्ष्यांचे लहानलहान गट तयार होतात. भारतात गुजरात राज्यातील कच्छच्या रणात विणीच्या हंगामात रोहित पक्षी मोठ्या संख्येने जमा होतात. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून ते मार्च-एप्रिल हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो. चिखलाच्या लहानलहान गोळ्यांनी तयार केलेले रोहित पक्ष्याचे घरटे वरच्या बाजूस खळगा असलेल्या शंकूच्या आकाराचे असते. दर खेपेला मादी घरट्यात एक निळसर रंगाचे अंडे घालते. जवळजवळ महिनाभर ते अंडे नर-मादी मिळून उबवितात. पिलांचा रंग भुरकट लाल असतो. पिलाचे संगोपन नर-मादी मिळून करतात.

भारतात मोठा रोहित व लहान रोहित दोन्हीही आढळतात. पावसाळ्यानंतर कच्छमध्ये जेव्हा पाणी आटते तेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात आणि देशात सर्वत्र पसरतात. गेल्या काही वर्षांत जलाशयातील तणांची भरमसाट वाढ व अन्नस्रोतांचे कमी होणारे प्रमाण यांमुळे रोहित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत हे पक्षी पाहायला मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button