तौक्ते चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या विशाल नरळकर यांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून मदतीचा हात – खासदार राजन विचारे
प्रतिनिधी – नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विविध भागात खूप ठिकाणी नागरिकांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. अनेक ठिकाणी झाडे कोसळून नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत दि. २० मे २०२१ रोजी बैठक घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला होता.
त्या पत्रात चक्रीवादळामुळे नवी मुंबईतील ऐरोलीत राहणारा विशाल नरळकर या युवकाचा नेरूळ येथून कामावरून परतताना रात्री दहाच्या सुमारास पाम बीच रस्त्यातील दुभाजकामधील विद्युत पोल त्याच्या अंगावर पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवीमुंबईत घडली होती. या संपूर्ण घटनेने ऐरोली मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनाही पत्रव्यवहार करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी मिळवून द्यावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती.
खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने आज १० लाखाची मदत त्यांच्या कुटुंबियांना करण्यात आली. त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाकडून ४ लाख व नवी मुंबई महानगरपालिकेकडून १ लाख तसेच संबंधित विद्युत पोलचा ठेकेदार यांच्याकडून ५ लाखाचा डिमांड ड्राफ्ट खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त केला. तसेच त्यांच्या पत्नी प्रियांका विशाल नरळकर यांना महापालिकेमध्ये नोकरी मिळवून दिली.
त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर विठ्ठल मोरे, उप जिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, मा. नगरसेवक संजू वाडे, आकाश मढवी, राजू पाटील, विभाग प्रमुख रवी पाटील, महिला आघाडी उप शहर संघटक सुषमा भोईर व इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर तसेच विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे प्रयत्न करीत होते. खासदार राजन विचारे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या सर्वांचे आभार मानले आहेत.