नवी मुंबई

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन – आयुक्त श्री. अभिजीत बांगर

दैनंदिन कोरोना बाधीतांची संख्या 50 ते 60 दरम्यान स्थिरावलेली असली तरी महानगरपालिका दक्ष

सप्टेंबर व ऑक्टोबरच्या दीड महिन्यात शून्य मृत्यूचे 22 दिवस- मृत्यू दरात घट

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांचे प्रमाण सध्या कमी झालेले दिसत असले तरी संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन कोरोना विषाणुला आहे तिथेच रोखण्यासाठी कोव्हीड टेस्टींगची संख्या कमी होऊ दिलेली नाही. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार दररोज साधारणत: 7500 नागरिकांची कोव्हीड टेस्ट केली जात आहे. आत्तापर्यंत 19 लक्ष 70 हजार 255 इतक्या कोव्हीड टेस्ट करण्यात आल्या असून यातही शासन निर्देशानुसार  एकूण टेस्टपैकी  आरटी-पीसीआर टेस्ट 60 टक्के आणि ॲन्टिजन टेस्ट 40 टक्के हे प्रमाण नवी मुंबई महानगरपालिकेने कायम राखले आहे.

कोव्हीडच्या प्रसाराची साखळी आहे तिथेच खंडीत होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या इमारतीत, वसाहतीत कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण सापडतो त्याठिकाणच्या सर्वांचे टारगेटेड टेस्टींग करण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 31 इतके आहे. या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाच्या विषाणू प्रसाराला प्रतिबंध आणण्यात यश मिळताना दिसते आहे. मात्र टेस्टींग आणि लसीकरण यांचे प्रमाण कमी होऊ नये याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देऊन आहेत.

साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून कोव्हीड बाधीतांची संख्या दोन आकडी  झाली असून मृत्यू दरातही मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसत आहे. 1 मार्च रोजी शून्य मृत्यू होता. त्यानंतर आता 6 सप्टेंबर या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसून सप्टेंबर महिन्यात 9, 13, 16 तसेच 18, 19 व 20 असे सलग तीन दिवस त्याचप्रमाणे 25, 26, 27, 28, 29 असे सलग 5 दिवस शून्य मृत्यूचे होते. अशाप्रकारे सप्टेंबर महिन्यात दिवसभरात एकही मृत्यू न झालेले 12 दिवस होते. हीच साखळी ऑक्टोबर महिन्यातही सुरु राहली असून 1 व 4 ऑक्टोबर तसेच 7, 8, 9, 10, 11 असे सलग 5 दिवस आणि 15, 17 व 19 अशाप्रकारे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 19 दिवसात 10 दिवस शून्य मृत्यूचे आहेत. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा मृत्यूदर 1.80 टक्के इतका कमी झालेला दिसून येतो.

मार्च 2020 पासून आत्तापर्यंत 1 लक्ष 8 हजार 23 इतक्या व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्या असून त्यामधील 1 लक्ष 5 हजार 585 नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. अशाप्रकारे कोरोनामधून बरे होणा-यांचे प्रमाण (Recovery Rate)  97.74 टक्के इतके लक्षणीय आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी  (Doubling Rate) 1773 दिवस म्हणजेच साधारणत: पावणे पाच वर्षे इतका झालेला असून येणारा उत्सवी कालावधी पाहता नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरिता दक्ष आहे.

कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्यासोबतच लांबलेल्या कालावधीचा उपयोग करून घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घेण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेली नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिला महानगरपालिका आहे. यापैकी 52.60 टक्के नागरिकांचे कोव्हीड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत.

टेस्टींगमध्येही सोसायटी, वसाहतींमधील टारगेटेड टेस्टींगप्रमाणेच एपीएमसी मार्केट व रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड टेस्टींग केंद्रे अथक कार्यरत आहेत. लसीकरणासाठीही 101 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. अगदी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काही लसीकरण केंद्रे सुरु ठेवण्यात येत आहेत.

यापुढील काळातील दिवाळीसारखा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काहीशी स्थिरावलेली दैनंदिन कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये याकरिता महानगरपालिका दक्ष असून ज्या नागरिकांनी लसीकरण करून घेतलेले नसेल त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या केंद्रावर जाऊन मोफत लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर, हातांची स्वच्छता या गोष्टींचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button