कोव्हीडच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारीला गती देण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश
कोव्हीडची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असल्याचे दिसून येत असल्याने महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हीड निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. तथापि इतर देशांतील जागतिक स्थितीचा आढावा घेता आरोग्य तज्ज्ञांमार्फत तिस-या लाटेचा धोका संभवत असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने याविषयी सुरूवातीपासूनच खबरदारी घेत दुस-या लाटेतील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची तसेच ऑक्सिजनची जाणवलेली कमतरता लक्षात घेऊन संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कोव्हीड विषयक आरोग्य सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात वाढ करण्यास सुरूवात केलेली आहे. त्यासोबतच नॉन कोव्हीड रूग्णांचीही गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेत वाशी सार्वजनिक रूग्णालयाप्रमाणेच बेलापूर व तुर्भे रूग्णालयांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.
तिस-या लाटेतील कोव्हीडग्रस्तांवरील उपचारांसाठी महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली रूग्णालयांमध्ये आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करताना त्यामध्ये मुलांसाठी तसेच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात महिलांसाठी विशेष व्यवस्था असणा-या आरोग्य सुविधा निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आयुक्तांनी या दोन्ही सुविधा कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत कामाला वेग देण्याचे निर्देशही दिले होते. याविषयी आयुक्त नियमित आढावा बैठक घेत असून प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.
आरोग्य सुविधांमधील स्थापत्य आणि विद्युतविषयक तसेच ऑक्सिजन पाईपलाईन बाबतची कामे जलद करण्याप्रमाणेच एकूण 500 पर्यंत आय.सी.यू. बेड्स निर्माण करण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या उपलब्धतेकडेही काटेकोर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 100 व्हेंटिलेटर्स, 100 बायपॅप, 20 आयसीयू बेड्स, 500 मल्टिपॅरा मॅनिटर, 50 डिफायब्रिलेटर अशी उपकरणे उपलब्ध करून घेण्यात आली आहेत. उर्वरित उपकरणेही जलद उपलब्ध करून घेऊन आरोग्य सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी विशेष आढावा बैठकीमध्ये दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.निलेश नलावडे उपस्थित होते.
दुस-या लाटेमध्ये जाणवलेला ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सिजनची क्षमता वाढविण्याकडेही विशेष लक्ष दिले असून नव्याने 80 टन क्षमतेचे टँक वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. त्यामध्ये 20 टनाचा टँक आलेला असून सिडको कोव्हीड सेंटरमध्ये तो बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे 20 टन क्षमतेचे आणखी 2 टँक एक महिन्याच्या कालावधीत लावण्यात येत आहेत. त्यास ड्युरा सिलेंडर भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून ज्यामधून इतर रूग्णालयांदेखील ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे एक 20 टन क्षमतेचा टँक ऐरोली रूग्णालयात बसविण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
यामध्ये ऑक्सिजन पीएसए प्लान्ट, ऑक्सिजन टॅंक, ड्युरा सिलेंडर उपलब्धतेबाबतचा आढावा घेताना या प्रक्रियेला अधिक गतिमानता देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर लॅबची क्षमता 5 हजारपर्यंत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचेही आदेशित करण्यात आले. याशिवाय सर्वसाधारण कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याचेही नियोजन असून त्याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागाला देण्यात आले.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कोव्हीड बाधीतांची संख्या कमी होताना दिसत असल्याने शासन आदेशानुसार दैनंदिन व्यवहाराला गती देण्यात आली आहे. तथापि कोव्हीडचा धोका टळलेला नसून ही संख्या मर्यादीत राखण्याकरिता नागरिकांनी कोव्हीड अनुरूप वर्तन ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
कोव्हीडच्या संक्रमणाला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन टेस्ट्सची संख्या कमी न करता 7 हजारापर्यंत ठेवलेली असून कोव्हीड रूग्ण आढळलेल्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे टेस्टींग करीत टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. त्या सोबतच कोव्हीडची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी होण्यासाठी लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 7 लक्ष 9 हजार नागरिकांचा पहिला डोस झालेला असून 2 लक्ष 49 हजार नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत.
तरी नागरिकांनी कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट जितकी दूर जाईल तितके अधिक नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित होतील हे लक्षात घेऊन कोव्हीड अनुरूप योग्य वर्तन ठेवत सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.