नवी मुंबई

कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक : कोव्हीडच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालकेचे नियोजन सुरु

कोव्हीडच्या दुस-या लाटेत प्रतिदिन आढळणा-या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत मागील आठवडाभरापासून घट होताना दिसत असली तरीही नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना सतर्कतेने राबवित आहे. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान कोव्हीडची तिसरी लाट येण्याची शक्यता नामांकीत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्यादृष्टीने नियोजनात्मक तयारी सुरु केलेली आहे.

या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज तिस-या लाटेच्या पूर्वतयारी संदर्भात वरिष्ठ अधिका-यांची विशेष बैठक घेऊन पहिल्या व दुस-या लाटेतील अनुभवाच्या तसेच इतर देशांतील आकडेवारीच्या आधारे संभाव्य तिस-या लाटेमध्ये करावयाच्या नियोजनाविषयी विस्तृत चर्चा केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.

कोव्हीडच्या पहिल्या लाटेमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्तीत जास्त 3688 तसेच दुस-या लाटेत ही संख्या जास्तीत जास्त 11605 इतकी वाढलेली होती. हा आलेख बघता तिस-या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या साधारणत: 25 हजार होईल असे जमेस धरून त्यापैकी 50 टक्के रुग्ण कोव्हीड सेंटरमध्ये दाखल होतील असे गृहीत धरून 12 हजार बेड्सच्या तयारीचे आत्तापासूनच नियोजन करून काम सुरू करायला हवे यादृष्टीने चर्चा करण्यात आली.

दुस-या लाटेमध्ये आयसीयू व व्हेन्टिलेटर्स बेड्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली हे लक्षात घेऊन तिस-या लाटेसाठी तयारी करताना आयसीयू बेड्सची क्षमता 1500 पर्यंत नेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सध्या 3000 इतके ऑक्सिजन बेड्स असून त्यामध्ये 2000 बेड्सची वाढ करत 5000 ऑक्सिजन बेड्स निर्मितीच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यात आला. त्यासोबतच सर्वसाधारण बेड्सचीही मोठ्या प्रमाणावरील आवश्यकता लक्षात घेऊन सध्याच्या 4000 बेड्समध्ये आणखी 4000 बेड्सची वाढ करण्याविषयी चर्चा करण्यात आली. या रुग्णालयीन सुविधा सुरु करण्यासाठी काही संभाव्य जागांबाबत चर्चा करण्यात येऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरीत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी व आरोग्य विभागाला दिले.

कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने लहान मुलांसाठी सर्वसाधारण बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स यासह पिडियाट्रीक व्हेन्टिलेटर्सची व्यवस्था असलेली विशेष कोव्हीड सेंटर्स 2 ते 3 ठिकाणी उभारण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. लहान मुलांच्या सेंटर्समध्ये त्यांच्यासोबत त्यांचे आई किंवा वडील केअरटेकर म्हणून असतील हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही व्यवस्था करणेबाबत तसेच नुकत्याच जन्मलेल्या बाळांसाठीही विशेष व्यवस्था करण्याविषयी नियोजन करण्यात आले.

बेड्स उपलब्धतेप्रमाणेच सुविधांमध्ये वाढ करताना विद्यमान मनुष्यबळाचा सुविधानिहाय बारकाईने आढावा घेऊन आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याबाबतची कार्यवाही करावी असे प्रशासन व आरोग्य विभागास निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे मुलांसाठी विशेष सुविधा निर्माण करताना तेथील सर्वसाधारण व आयसीयू वॉर्डमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण विद्यमान कर्मचा-यांना त्यातही विशेषत्वाने नर्सेसना देणेबाबत त्वरीत कार्यवाही सुरु करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.

नवीन सुविधा निर्मिती करताना त्यामध्ये आवश्यक उपकरणे, औषध पुरवठा, त्यातही विशेषत्वाने मुलांसाठीच्या विशिष्ट प्रकारच्या चाचण्या आणि औषधांची उपलब्धता याबाबतची कार्यवाही आत्तापासूनच सुरु करावी अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

दुस-या लाटेमध्ये जाणवलेला ऑक्सिजन तुटवड्याचा अनुभव लक्षात घेता महानगरपालिकेमार्फत सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याबाबतची कार्यवाही सुरु असून मे अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या व्यतिरिक्त आणखी 2 प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु असून सध्याची गरज लक्षात घेता महानगरपालिकेचा स्वत:चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याविषयी विचार करण्यात आला. दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असताना आगामी संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button