नवी मुंबई

कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-या 65937 नागरिक / आस्थापनांकडून 3 कोटीहून अधिक दंड वसूल, दक्षता पथकांनी एका महिन्यात वसूल केला 21 लाखाहून अधिक दंड

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र’ आदेश जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक स्तरांनुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तर 3 मध्ये असून त्यामधील निर्बंधांचे पालन करण्याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याकरिता विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत दक्षता पथकांप्रमाणेच प्रत्येक पथकात 5 कर्मचा-यांचा समावेश असलेल्या 31 विशेष दक्षता पथकांकडून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिक / आस्थापना यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून दंड वसूली हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट नसून आपल्या बेजबाबदार वर्तनाने सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-यांना या दंडात्मक कारवाईव्दारे समज मिळावी ही यामागील भूमिका असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 जून ते 4 जुलै 2021 या एका महिन्याच्या कालावधीत 4312 नागरिक / आस्थापना यांच्यावर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रु. 21 लक्ष 30 हजार 550 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता दक्षता पथकांव्दारे नियंत्रण राखत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन केल्यामुळे एकूण 65937 नागरिक / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत रु. 3 कोटी 2 लक्ष 80 हजार 650 इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे.

कोव्हीडच्या दुस-या लाटेचा प्रभाव मागील आठवड्यापासून काहीसा स्थिरावलेला दिसत असून नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन टेस्टींगची संख्या कमी न करता 6000 पेक्षा अधिक ठेवलेली आहे. तसेच कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारीही गतीमानतेने सुरु केलेली आहे. लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे याकडेही लक्ष देत लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच विविध सेवा पुरविताना कोव्हीडदृष्ट्या संभाव्य जोखमीच्या व्यक्तींच्या (Potential Superspreaders) लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे कॉरी क्षेत्रातील मजूर, रेडलाईट एरिआ, बेघर निराधार अशा दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण करून घेतले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 5 लक्ष 70 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

लसीकरण झालेले असले तरी मास्कचा वापर करणे तसेच कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे याबाबत विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण केली जात आहे. तरी नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ ठेवणे ही सुरक्षेची त्रिसूत्री आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवावी व कोव्हीड अनुरुप वर्तनाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच प्रतिबंधात्मक आदेशानुसार दुकाने / आस्थापना या सुरु ठेवण्याच्या जाहीर कालावधीतच सुरु ठेवाव्यात व दंडात्मक कटू कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button