कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याने 2 लग्न समारंभास प्रत्येकी 50 हजार दंडात्मक वसूली
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार टेस्टींगमध्ये वाढ, लसीकरणाचे दोन्ही डोस जलद गतीने पूर्ण कऱण्यावर भर दिला आहे. त्याचप्रमाणे कोव्हीड लसीकरण झाले असले तरी कोव्हीडची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे लक्षात घेत मास्क न वापरता सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाया तीव्र स्वरुपात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.
त्याचप्रमाणे शासनाने जाहीर केलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार लग्न समारंभाकरिता बंदिस्त सभागृहात सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीस व खुल्या जागांमधील लग्न समारंभास जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आलेली आहे.
तथापि सदर नियमांचे उल्लंघन करणा-या नेरुळ जिमखाना तसेच सेक्टर 21 नेरुळ येथील हावरे मॉलमधील सभागृह या ठिकाणी संपन्न होणा-या 2 लग्न समारंभाच्या ठिकाणी नमुंमपा मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकाने दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी रु.50 हजार याप्रमाणे रु, 1 लक्ष दंडात्मक रक्कमेची वसूली केली आहे.
कोव्हीडचा धोका अजून टळलेला नाही व ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आपल्या शेजारील शहरात सापडलेले आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वत:ची व इतरांची काळजी घेणे गरजेचे असून मास्कचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी प्रत्येक नागरिकाने आपल्या कोव्हीड लसीकरणातील दुसरा डोस घेणे शिल्लक असल्यास तो विहीत कालावधीत त्वरीत घ्यावा व लसीकरण झाले असले तरी मास्कचा वापर नियमित करावा, सुरक्षित अंतर राखावे आणि हात स्वच्छ ठेवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर याच्या वतीने करण्यात येत आहे.