कोव्हीड प्रतिबंधात स्थानिक पातळीवर महत्वाची भूमिका असणा-या खाजगी डॉक्टरांसाठी विशेष वेबिनार
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रयत्न केले जात असताना स्थानिक पातळीवर खाजगी डॉक्टरांची यामधील महत्वाची भूमिका लक्षात घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुप्रसिध्द फिजीशिअन तथा महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. अजय कुकरेजा यांनी सादरीकरणाव्दारे संबोधित केले.
कोरोनाच्या दुस-या लाटेत कोव्हीड रूग्णाची प्रकृती कमी कालावधीत झपाट्याने खालावत असल्याचे निदर्शनास येत असून हे लक्षात घेऊन खाजगी डॉक्टरांनी कोमॉर्बिड व्यक्ती तसेच 50 वर्षावरील व्यक्ती यांना महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा त्यांच्या इच्छेनुसार रूग्णालयात उपचारार्थ दाखल होण्याचा प्राधान्याने सल्ला द्यावा असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. सध्या ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालावण्याचे प्रमाण लक्षात घेता रूग्णाच्या दृष्टीने 94 ऑक्सिजन पातळीनंतरचे प्रत्येक मिनीट धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन शक्यतो 50 वर्षावरील व्यक्ती गृह विलगीकरणात (Home Isolation) राहणार नाही याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले.
घरी विलगीकरणात असलेला रूग्ण ऑक्सिजन पातळी अचानक खालावून थेट आयसीयू व्हेंटिलेटर सुविधेत दाखल करावा लागतो याचे गांभीर्य समजून घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तरीही एखादा रूग्ण गृह विलगीकरणातच राहण्याचा हट्ट करीत असेल तर तो घराबाहेर पडणार नाही याची खबरदारी घेण्याची व त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची काळजी घेण्याचे खाजगी डॉक्टरांना स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटर मधील प्रत्येक सुविधेचा दर्जा उत्तम राहील याची काळजी घेतली जात असून एखादी तक्रार आली तर त्याचे त्वरित निराकरण करण्यात येत आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी कोरोना बाधितांना उपचारार्थ दाखल होण्याकरिता प्राधान्याने महानगरपालिकेची कोव्हीड सेंटर सूचवावीत असेही आयुक्तांनी सांगितले.
आपल्याकडे येणा-या कोरोना सदृष्य लक्षणे जाणवणा-या रूग्णाची कोव्हीड टेस्ट करून घ्यावी व अशी लक्षणे असणा-या व्यक्तींची नावे, मोबाईल नंबर एका कागदावर लिहून त्याचा फोटो काढून संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना पाठविल्यास अशा व्यक्तींवर वेळेत उपचार करणे शक्य होईल अशा सूचना खाजगी डॉक्टरांना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या.
याप्रसंगी कोव्हीड उपचारपध्दतीविषयी वेबसंवादात सादरीकरणाव्दारे मार्गदर्शनपर भाष्य करताना सुप्रसिध्द फिजीशिअन तथा महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. अजय कुकरेजा यांनी कोव्हीड प्रतिबंधामध्ये रूग्ण विश्वासाने ज्यांच्याकडे पहिल्यांदा जातो अशा खाजगी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले.
कोव्हीडसदृष्य लक्षणांची शंका जरी आली तरी कोव्हीड टेस्ट करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. कोणत्या स्वरूपाची लक्षणे असणा-या रूग्णांना कोणती ओषधे द्यावीत, त्यांच्या कोणत्या तपासण्या कधी कराव्यात, त्यांच्यावरील उपचारपध्दती कशी असावी याविषयी डॉ. कुकरेजा यांनी सविस्तर माहिती दिली तसेच विचारलेल्या शंकांचे निरसनही केले. ऑक्सिजन पातळी ही अत्यंत महत्वाची बाब असून 6 मिनीट टेस्टव्दारे ऑक्सिजन पातळी खालावत आहे किंवा नाही याकडे काळजीपूर्वक व नियमित लक्ष देण्याचे सूचित करतानाच त्यांनी 50 वर्षावरील तसेच कोमॉर्बिडिटी असलेले कोव्हीड रूग्ण हे रूग्णालयात दाखल करण्यास प्राधान्य द्यावे असा सल्ला दिला.
त्याचप्रमाणे कोव्हीडची लस अत्यंत सुरक्षित असून लस घेतल्याने कोव्हीडमुळे होणा-या प्रकृतीच्या संभाव्य हानीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने ती अत्यंत लाभदायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि लस कोव्हीशील्ड असो की कोव्हॅक्सिन लाभार्थ्यांना विनाविलंब लस घेण्यास प्रोत्साहित करावे असे खाजगी डॉक्टरांना आवाहन केले.
कोव्हीड विरोधातील लढाईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार करणा-या खाजगी डॉक्टरांची महत्वाची भूमिका असल्याने या विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे याचे महत्व ओळखून 302 डॉक्टर्स यामध्ये सहभागी झाले होते. अशाच प्रकारचे आणखी काही वेबिनार उर्वरित खाजगी डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात येतील असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले.