कोव्हीड 19 पहिला डोस 100% लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर
कोव्हीड 19 लसीकरणाकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी सुरूवातीपासूनच विशेष लक्ष देत लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळेच 18 वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर ठरले आहे. आत्तापर्यंत 18 वर्षांवरील 11 लक्ष 7 हजार 233 नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे म्हणजेच 100.02 टक्के लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे विहित कालावधीत दुसरा डोस दिला जावा याकडेही कटाक्षाने लक्ष दिल्यामुळे दोन्ही डोस घेणा-या नागरिकांची संख्याही 5 लक्ष 76 हजार 567 म्हणजेच लक्ष्यांकाच्या 52.08 टक्के इतकी लक्षणीय आहे.
कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त नागरिक लस संरक्षित व्हावेत याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष आहे. नियमित होणा-या वैद्यकीय अधिकारी यांच्या वेबसंवादामध्ये लसीकरणाचा नियमित आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये लसीकरण वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन नागरिकांना सुलभपणे घराजवळ लसीकरण करता याने यादृष्टीने लसीकरण केंद्र संख्येतही आवश्यकतेनुसार भर घालण्यात आली आहे. अगदी लसींची कमतरता होती त्या कालावधीतही लसीकरणाचे दैनंदिन नियोजन करून पहिल्या व दुस-या डोसचा योग्य ताळमेळ राखण्यात आला. लस कमी प्रमाणात उपलब्ध होती अशा सुरूवातीच्या काळात 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. तसेच ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेण्यात आली. अगदी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे सुरू ठेवून लसीकरणात एकही दिवस खंड पडू दिला नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे नवी मुंबई हे 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारे एम.एम.आर. क्षेत्रातील पहिले शहर ठरले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आत्तापर्यंत 11 लाख 7 हजार 233 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 5 लाख 76 हजार 567 नागरिक कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेत पूर्ण संरक्षित झालेले आहेत.
यामध्ये –
अशाप्रकारे कोव्हीड लसीचे एकूण 16 लक्ष 83 हजार 800 डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत.
साधारणत: सप्टेंबर महिन्यात लसींचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होऊ लागल्यानंतर लसीकरण केंद्र संख्येत 110 पर्यंत वाढ करीत 101 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. त्यामध्ये ईएसआयएस रूग्णालय सेक्टर 5 वाशी व विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथील लसीकरण केंद्रांमध्ये दोनपेक्षा अधिक बूथ कार्यान्वित करून जम्बो लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅंड सेंट्रल मॉल सीवूड नेरूळ येथे ड्राईव्ह इन लसीकरणाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर महापालिका रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे नागरिकांच्या सोयीसाठी 24 तास कार्यान्वित करण्यात आली.
याशिवाय ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती (Potential Superspreders) त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्ती यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.
तसेच बेघर, निराधार व्यक्ती यांच्या लसीकरणाकरिता विशेष संगणकीय प्रणाली तयार करून लसीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे तृतीयपंथीय तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी वृध्दाश्रमात जाऊन तसेच घरी जाऊन लसीकरण करण्यात येत असून शासनाने जाहीर केलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेअंतर्गत 12 रूग्णवाहिकांव्दारे 192 स्पॉट्सवर जाऊन ‘लसीकरण आपल्या दारी’ उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोणताही घटक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये याची सर्वोतोपरी काळजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेतली जात आहे.
कोव्हीड लसीकरणातील पहिल्या डोसचे 100 टक्के लक्ष्य गाठणारे शहर ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी समाधानाची आणि अभिमानाची बाब असून नवी मुंबईकर नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालेले आहे. यापुढील काळात दुस-या डोसचे लसीकरण विहित वेळेत व्हावे याचे बारकाईने नियोजन केले जात असून शहरातील तरंगती लोकसंख्या (Floating Population) विचारात घेता पहिला डोसचे लसीकरणही सुरू असणार आहे. तरी नागरिकांनी महानगरपालिकेच्या केंद्रांवर जाऊन विनामूल्य लसीकरण करून घ्यावे. तसेच महत्वाचे म्हणजे लसीचे एक अथवा दोन्ही डोस घेतले असले तरी तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर, चेह-याला कोठेही स्पर्श न करणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात स्वच्छ करणे असे कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) आपली सवय बनविणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या कोरोनाबाधीतांची संख्या काहीशी कमी झालेली दिसत असली तरी कोरोना अजून संपलेला नाही याची जाणीव नागरिकांनी राखावी व कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.