देशात ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे उत्पादन ऑगस्टपासून सुरु होणार
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे लसी हा एकच पर्याय उपलब्ध आहे. देशात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसी आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारताला आणखी एक शस्र मिळणार आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचे देशात ऑगस्ट महिन्यापासून उत्पादन सुरु करणार आहे.
भारतात स्पुतनिक व्ही लसीचे ८५ कोटी डोस सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तयार केले जातील. जगातील ६५ ते ७० टक्के स्पुतनिक व्ही लस भारतात तयार होईल,असे रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा यांनी सांगितले आहे. भारतातील स्पुतनिक लसीची गरज पुर्ण झाल्यानंतर रशिया इतर देशांमध्येही लस निर्यात करणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सिन नंतर भारतात आपत्कालीन वापरसाठी मान्यता मिळालेली स्पुतनिक ही तिसरी लस आहे. देशात कोरोनानंतर रुग्णांना भेडसावणाऱ्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या संदर्भातही भारत रशियाशी संपर्कात आहे. म्युकरमायकोसिसवर उपचारांसाठी रशियामधूनही औषधे मागवली जाऊ शकतात, असेही रशियामधील भारतीय राजदूत डीबी व्यंकटेशन वर्मा म्हणाले आहेत.
रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि रशियाचा सोव्हान वेल्थ फंड या लसीसाठी निधी पुरवत आहेत. लसीच्या उत्पादनासाठी त्यांनी भारतातीत पाच कंपन्यांशी करार केला आहे. भारतात आतापर्यंत स्पुतनिक लसीचे २ लाख १० हजार डोस मिळाले आहेत. मे महिन्याच्या अखेरीस ३० लाख लसीचे डोस आणि जून महिन्यात ५० लाख लसीं डोस मिळणार आहेत.
भारतात स्पुतनिक लसीचे उत्पादन तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. रशियाकडून पुरवठा आणि पूर्णपणे उत्पादन आधीच सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात RDIF मोठ्या प्रमाणात भारतात लस पाठवेल. त्या वापरासाठी तयार असतील. फक्त त्या विविध बाटल्यांमध्ये भराव्या लागतील. तिसऱ्या टप्प्यात रशिया संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करुन भारतीय कंपन्या संपूर्ण लसीचे उत्पादन भारतात करणार आहे.