महानगरपालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरुळ रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारासाठी ओपीडी सेवा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तज्ज्ञ डॉक्टरांशी वेब संवादानंतर तातडीने केली उपाययोजना
कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्यानंतर आधीपासूनच मधुमेह, मुत्रपिंडाशी संबंधीत आजार, अवयवप्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याचे काही उदाहरणांवरून निदर्शनास येत असून याचे गांभीर्य लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने वेब संवादाव्दारे या विषयातील तज्ज्ञांची बैठक आयोजित करून याबाबतच्या उपाययोजनांविषयी सविस्तर चर्चा केली.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांत म्युकरमायकोसिस बाबतचे बाह्य रुग्ण सेवा कक्ष (OPD) त्वरीत सुरु करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आलेले आहेत. एखाद्या व्यक्तीस हा आजार झाल्याचे आढळल्यास त्या रुग्णावर वाशीच्या महापालिका सार्वजनिक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत तसेच त्याबाबतची पूरक औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे कोरोना बाधीत रुग्णांमधून बरे झालेल्या मधुमेही रुग्ण व मुत्रपिंडाशी संबंधीत आजार असणा-या व्यक्तींना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉलसेंटरव्दारे कोरोनामुक्त झाल्यानंतर 10 दिवसापासून 6 आठवडे कालावधीपर्यंत नियमित फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी व या आजाराशी संबंधीत लक्षणांविषयी माहिती घेतली जाणार आहे. जेणेकरून म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळणा-या रुग्णांवर त्वरीत उपचार करणे शक्य होणार आहे. या आजाराच्या कराव्या लागणा-या टेस्ट्स, औषधोपचार याबाबतही तातडीने कार्यवाही सुरु करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
या वेब बैठकीस महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वाशी सार्वजनिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. समीर बोभे, डॉ. शरद भालेकर, डॉ. मिताली नायक, डॉ. अर्जिता शारदा, डॉ. विनित अडवाणी व मायक्रो बायोलॉजीस्ट डॉ. नदीम आदी या क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठ डॉक्टर्स सहभागी होते.
कोरोनाबाधीत रुग्णांवरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर व स्टेरॉईडचा वापर करावा लागतो. यामुळे रुग्ण जर मधुमेही असेल तर त्याच्या रक्तातील साखर वाढते. हे प्रमाण काही रुग्णांमध्ये खूप वाढत असल्याचेही कोव्हीड पश्चात उपचारांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे मधुमेह किंवा किडनीचे आजार अथवा अवयवप्रत्यारोपण झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होत असल्याचे मत या डॉक्टरांनी व्यक्त केले.
म्युकरमायकोसिसमध्ये नाकाच्या बाजुला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते. कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ही बुरशी वेगाने वाढते व तिचा प्रसार डोळे, घसा, मेंदू इथपर्यंत पोहचतो. नाक सतत वाहत राहणे, नाक सुन्न झाल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, दृष्टी अधू होणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे, गाल दुखणे वा सूज येणे, दात हलू लागणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून या प्रकारची कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्या व्यक्तीने त्वरीत कान नाक घसा तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
म्युकरमायकोसिस आजार पसरण्याचा वेग जास्त असून त्याचा प्रभाव अधिक वाढल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण लवकरात लवकर उपचाराच्या कक्षेत येणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन याबाबत रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. म्युकरमायकोसिसचे प्रमाण कमी असले तरी प्रत्येक रुग्णाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून एकाही रुग्णाला त्याची लागण होऊ नये व लागण झाली असल्यास त्यावर त्वरीत उपचार करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक उपाययोजना करीत आहे. तरी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनीही आपल्या प्रकृतीबाबत दक्ष रहावे व काही लक्षणे जाणवल्यास त्वरीत महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालयांतील बाह्य रुग्ण कक्षाशी (OPD) संपर्क साधून तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.