महानगरपालिकेच्या घणसोली शाळेत सौरऊर्जा पॅनलव्दारे वीज बचत
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारती प्रशस्त व अभ्यासाला पूरक वातावरण असणा-या असून अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहेत. त्यामध्ये ऊर्जा बचतीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकत महानगरपालिकेच्या घणसोली शाळा क्र.105 इमारतीच्या छतावर लुब्रीझॉल कंपनीच्या सीएसआर निधीतून सौरऊर्जा पॅनलव्दारे ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध पर्यावरणशील उपक्रम राबवित असताना पंचतत्वातील ऊर्जा तत्वाचे महत्व अधोरेखीत करणारा सौरऊर्जा निर्मितीचा हा प्रकल्प पर्यावरण संवर्धक आहे.
15 किलोवॅट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून याव्दारे दिवसाला 45 युनिट वीज निर्मिती केली जात आहे. याव्दारे शाळा इमारतीतील 45 वर्गातील लाईट, पंखे यांना वीजपुरवठा होणार असून यामधून शाळेचे 40 ते 50 टक्के मासिक विद्युत देयक कमी होणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी लुब्रीझॉल कंपनीने 10 लाखापेक्षा अधिक रक्कमेचा सीएसआर निधी दिलेला असून याव्दारे अपारंपारिक ऊर्जेला उत्तेजन व शाळेच्या विद्युत देयकात कपात असे दोन्ही उद्देश साध्य होत आहेत. यापुढील काळात इतरही महापालिका इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवून माझी वसुंधरा अभियानातील ऊर्जा संवर्धन या महत्वाच्या घटकाला प्राधान्य देण्यात येणार आहे.