कन्टेनमेंट झोनमधील अंमलबजावणीची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ट्रेस (शोध), टेस्ट (चाचणी) आणि ट्रिट (तपासणी)’ या त्रिसूत्रीवर आधारीत ‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असताना यामधील महत्वाचा घटक असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राच्या (कन्टेनमेंट झोन) काटेकोर अंमलबजावणीकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत.
दररोज संध्याकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांच्यासोबत आयुक्त वेबसंवादाव्दारे घेत असलेल्या आढावा बैठकीमध्ये कोरोना साखळी खंडीत करण्यामधील कन्टेनमेट झोनच्या अंमलबजावणीचे महत्व लक्षात घेऊन याकडे सतर्कतेने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत दिले जात आहेत.
या अनुषंगाने आज आयुक्तांनी बेलापूर व नेरूळ विभागातील तिस-या प्रकारच्या म्हणजे सहा अथवा त्यापेक्षा अधिक रूग्ण एकाच इमारतीत असलेल्या मायक्रो कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या सोसायट्यांना भेट देत तेथील अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. दत्तात्रय नागरे उपस्थित होते.
नेरूळ सेक्टर 13 येथील एस.बी.आय. बँक कॉलनीमधील एम 1 टॉवरमध्ये 10 कोरोनाबाधित असून बॅंक ऑफ इंडिया कॉलनीमधील डी 3 टॉवरमध्ये 14 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे तेथे तिस-या प्रकारचा मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर केलेला असून त्याठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्राची आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी तसेच सुरक्षारक्षक यांच्याशी संवाद साधत कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीविषयी त्यांच्यामार्फत केल्या जाणा-या कार्यवाहीविषयी आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. कन्टेनमेंट झोन असताना जीवनावश्यक बाबींची पूर्तता प्रवेशव्दाराजवळ केली जात आहे काय याचीही माहिती घेत त्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण आहे काय हे देखील आयुक्तांनी जाणून घेतले व यात अडचण भासल्यास विभाग अधिकारी यांच्यामार्फत त्या त्वरित दूर करण्यात येतील असे आश्वस्त केले.
बॅंक ऑफ इंडिया कॉलनीमधील डी 1 इमारतीमध्ये एका मजल्यावर 2 रूग्ण असल्याने तो मजला 5 पेक्षा कमी रूग्ण असलेल्या पहिल्या प्रकारच्या श्रेणीत मिनी कन्टेनमेंट झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात आला असून तेथील व्यवस्थेचीही आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्या मजल्यावर लिफ्टच्या बटणावर तो मजला सील असल्याची चिठ्ठी लावणे तसेच जिन्याजवळ हा मजला प्रतिबंधित क्षेत्र आहे याचा इतरांच्या माहितीसाठी जरा मोठ्या आकारातील फलक लावणे याबाबत त्यांनी महत्वाच्या सूचना केल्या.
बेलापूर विभागात सेक्टर 27 नेरूळ येथील महावीर दर्पण सोसायटीमध्ये 6 कोरोनाबाधित असल्याने तिस-या प्रकारचा मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून त्याठिकाणीही भेट देत तेथील व्यवस्थेचीही आयुक्तांनी पाहणी केली व सोसायटी अध्यक्षांशी चर्चा केली.
या तिन्ही ठिकाणी पदाधिका-यांशी चर्चा करताना आयुक्तांनी त्यांच्या इमारतीत 50 वर्षावरील कोणी कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहे काय याची विशेषत्वाने विचारणा केली. सध्या कोरोना बाधितांमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालावण्याची स्थिती लक्षात घेता शक्यतो 50 वर्षावरील कोरोना बाधितांनी महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा रूग्णालयामध्ये ॲडमिट होऊन डॉक्टरांच्या निगराणीखाली रहावे याकरिता सोसायटी पदाधिका-यांनी जागरूकतेने पुढाकार घ्यावा असे आयुक्तांनी सूचित केले.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत सोसायट्यांचे व्हॉट्रस ॲप समुह तयार करण्यात आलेले असून त्यावर सोसायटी पदाधिका-यांना नियमितपणे जनजागृतीपर, माहितीपर महत्वाचे संदेश पाठविण्यात येतात, ते संदेश पदाधिका-यांनी आपल्या सोसायटी सदस्यांच्या व्हॉट्सॲप समुहावर टाकून महत्वाची माहिती सर्वांमध्ये प्रसारित करावी असे आयुक्तांनी सोसायटी पदाधिकारी यांना सांगितले.
कन्टेनमेट झोनची प्रभावी अंमलबजावणी हा कोरोना प्रतिबंधातील महत्वाचा घटक असून त्याकडे विभाग अधिकारी यांनी जरासेही दुर्लक्ष करू नये असे सूचित करतानाच कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांचीही असून त्यांनी याकामी सतर्क राहून महापालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.