‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नागरिकांच्या सहभागावर विशेष भर
महात्मा गांधीजींनी स्वच्छता कार्याला महत्व देत श्रमप्रतिष्ठेला महत्व दिले. त्यांनी स्वच्छतेचे काम करणा-या कर्मचा-यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपणही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला नाही आणि घरातूनच कच-याचे वर्गीकरण करणे ही आपली नियमित सवय बनविली तर सफाई कर्मचा-यांचे काम हलके होईल आणि ती महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ठरेल असे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे आपले ध्येय व्हावे आणि त्या ध्येयपूर्तीचे प्रत्येक नागरिकाला वेड लागावे असे सांगत त्यादृष्टीने ‘माझं शहर, माझा सहभाग’ अशा नव्या स्वरूपातील आवाहन केले.
2 ऑक्टोबर रोजीच्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील अँम्फिथिएटरमध्ये आयोजित ‘प्रारंभ – स्वच्छ सर्वेक्षण 2022’ उपक्रमाप्रसंगी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर बनण्याची क्षमता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असून त्याकरिता लोकसहभाग वाढीवर अधिक भर देण्यात येत आहे. त्याकरिता प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सक्रीय सहभाग दिला तर हे अशक्य नाही असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
आगामी काळात स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जात शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक उत्तम प्रकारे वाटचाल करीत असताना अनेक घरांमध्ये असलेल्या पाळीव प्राण्यांच्या विष्ठेची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने नवी मुंबईतील प्रत्येक उद्यानात एका भागात पेट कॉर्नर निर्माण करण्याची अभिनव संकल्पना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी मांडली. त्याठिकाणी भुसभुशीत वाळू, स्कुपर, डस्टबीनची व्यवस्था असणार असून याव्दारे पाळीव प्राण्यांच्या विष्ठेमुळे होणारा अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही सुविधा निर्माण केल्यानंतरही कोणी बेजबाबदारपणे नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल व त्यासाठी एक दक्षता पथक निर्माण करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, स्वच्छतेमध्ये एक निकोप स्पर्धात्मक दृष्टीकोन असावा आणि यामधून स्वच्छता कार्याला गती मिळावी यादृष्टीने प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छतेचे निकषांच्या आधारावर मूल्यांकन करून दरमहा त्यांचा गुणानुक्रम जाहीर करणे तसेच सहा महिन्यांच्या मूल्यांकनानुसार प्रथम तीन क्रमांकांच्या वॉर्डला पारितोषिके देण्यात येतील अशी अभिनव संकल्पना आयुक्तांनी जाहीर केली. अशाच प्रकारे झोपडपट्टी व गावठाण विभागाकरिताही स्वच्छतेचे मूल्यांकन करून सहा महिन्यांनी 5 स्वच्छ झोपडपट्ट्या व 5 स्वच्छ गावठाणे जाहीर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. या गुणवत्तापूर्ण स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ झोपड़पट्टी, स्वच्छ गावठाण यांची पारितोषिक रक्कम तेथील सुशोभिकरण कामांसाठी खर्च करण्यात येईल असे आयुक्तांनी जाहीर केले.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये सॅनिटेशनमधील वॉटरप्लस मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर असल्याचा अभिमान व आनंद व्यक्त करतानाच मानांकने मिळाल्यानंतर ती कायम राखण्याची आपली जबाबदारी वाढते असे स्पष्ट करीत आयुक्तांनी स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक त्यादृष्टीने नेहमीच जागरूक असतात असा विश्वास व्यक्त केला.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला राष्ट्रीय स्तरावर आजपासून प्रारंभ होत असला तरी आपण 15 ऑगस्ट रोजी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासूनच याची सुरूवात केलेली असून स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या दोन्ही अभिनव उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. त्यामधील ‘दत्तक रस्ता’ संकल्पनेमध्ये सहभागी होत 10 रस्ते नागरिक/संस्था यांनी दत्तक घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्याचप्रमाणे ‘झिरो वेस्ट स्लम’ उपक्रमात 7 नवीन झोपडपट्टी क्षेत्रांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे उपक्रम यशस्वी रितीने कार्यान्वित राहण्यासाठी नागरिकांशी नियमित संवाद ठेवण्याची सूचना यावेळी आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारीवृंदाला केली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शौचालय स्वच्छतेची दैनंदिन जपणूक करणा-या आठ विभागातील प्रत्येकी एक अशा आठ स्वच्छतामित्रांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. आरंभ क्रिएशन्सच्या कलावंत समुहाने सादर केलेल्या जनजागृतीपर संगीतमय कलाविष्कारालाही चांगली दाद मिळाली. यानिमित्त संगणकाच्या टाकाऊ कि-बोर्ड पासून बनविलेली महात्मा गांधीजींची प्रतिमा व स्वच्छ भारत मिशनचे बोधचिन्ह यांच्या शिल्पाकृतींचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
आत्तापर्यंत महानगरपालिकेचा गौरव नागरिकांच्या संपूर्ण सहकार्यामुळेच वाढला असून यापुढील काळात ‘माझं शहर, माझा सहभाग’ या आत्मिय भूमिकेतून नागरिकांनी आपल्या शहराला देशात नंबर वन आणण्याकरिता सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.