नवी मुंबई

शहर स्वच्छतेत अडथळा असणा-या रस्त्यांवर उभ्या बेवारस वाहनांची माहिती महापालिका वेबसाईटवर प्रसिध्द

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

नियमानुसार शुल्क भरून वाहन सोडवून नेण्याचे जाहीर आवाहन

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 230 अन्वये महानगरपालिका आयुक्त यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर वा पदपथावर कोणतीही वस्तू ठेवण्यास मनाई आहे. परंतू,शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठया प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठया प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही व शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये ‘निश्चय केला-नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून सामोरे जात असताना अशाप्रकारच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर स्वच्छतेला खीळ बसते आहे. याबाबत महानगरपालिकेमार्फत अशी वाहने हलविणेबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असून अशा वाहनांवर रितसर नोटीसाही संबंधित विभाग कार्यालयामार्फत लावण्यात आल्या आहेत. तथापि अनेक वाहन मालकांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 231 अन्वये महानगरपालिका आयुक्त यांना रस्त्यावर वा पदपथावर ठेवण्यात आलेल्या वस्तू नोटीस न देता काढून टाकण्याचा अधिकार प्राप्त आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने नियमितपणे वाहने हटविणेबाबत संबंधित वाहन मालकांना, संबंधित विभाग कार्यालयामार्फत नोटीसा बजाविलेल्या होत्या. तसेच महानगरपालिकेकडून वृत्तपत्रातून जाहीर आवाहनही करण्यात आलेले होते. मात्र संबंधित मालकांनी त्यांची बंद अवस्थेत असलेली वाहने अद्यापही हटविलेली नसल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 230 व 231 अन्वये, शहरातील सर्वच नोडमध्ये बंद वाहने ठिकठिकाणी मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर मोठ्या प्रमाणात उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सन 2016 पासून ते आजतागायत महानगरपालिकेकडून बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

या जाहीर सूचनेन्वये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई शहरातील तमाम सूज्ञ व जागरुक नागरिक असलेल्या संबधित वाहन मालक यांना आवाहन करण्यात येते की, सन 2016 मध्ये परिमंडळ 1 व 2 अंतर्गत येणा-या विभाग कार्यालयांकडून मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर बंद अवस्थेत उभी असलेली वाहने उचलण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे. उचलण्यात आलेली वाहने ही कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या डंपींग ग्राऊंडवर तसेच ऐरोली व महापे येथे जमा करण्यात आलेली आहेत.

सदर जमा करण्यात आलेल्या 2126 वाहनांची सूची नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई करून उचललेल्या वाहनांच्या मालकांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्या वाहनाविषयी माहिती घ्यावी. ज्या मालकांची ही वाहने आहेत त्या वाहन मालकांना या जाहीर आवाहनव्दारे कळविण्यात येते की, संबंधित मालकाने हे जाहीर आवाहन प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित वाहनाची मूळ कागदपत्रे दाखवून विभाग कार्यालयात नियमानुसार शुल्कचा भरणा करावा व वाहन जमा असलेल्या ठिकाणाहून आपले वाहन स्वखर्चाने घेऊन जावे.

उर्वरित वाहनांबाबत यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्विकारणार नाही याबाबत उप प्रादेशिक वाहतूक अधिकारी (संबंधित) यांनी नोंद घ्यावी. जे वाहन मालक 15 दिवसांच्या आत वाहन घेऊन जाणार नाहीत, अशी वाहने नवी मुंबई महानगरपालिकेकडून बेवारस वाहन म्हणून घोषित केली जातील. तद्नंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील कलम 79 अन्वये घोषित केलेल्या / बेवारस ठरविलेल्या वाहनांची महापालिकेमार्फत निविदा काढून भंगारात विक्री करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत सूचित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button