सिनेदिग्दर्शक अजित जाधव यांना समाज सेवक सलीम सारंग यांचा आर्थिक मदतीचा हात:
मुंबई प्रतिनिधी: मालाड पूर्व उपनगरात शनिवारी १७ जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर कुरार गावातील तानाजी नगर येथे पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. कित्येक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरगुती मालमत्तेचे नुकसान झाले.
यावेळी सिनेदिग्दर्शक अजित जाधव यांच्या सुद्धा घरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात पाणी घुसल्याची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर टाकली तेव्हा मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळीनी हळहळ व्यक्त केली होती. त्यांच्या घरांत मोठ्या प्रमाणात अक्षरशः गुडघ्याइतके पाणी भरले होते.
सिनेदिग्दर्शक अजित जाधव यांनी भीतीदायक ३-४ तास अनुभवल्यानंतर २६ जुलैच्या पावसाळी संकटाची आणि नुकसानाची आठवण झाल्याचे आपल्या सोशल मीडियातून व्यक्त केली. ही पोस्ट उमेश चौधरी यांनी वाचल्यानंतर समाज सेवक सलीम सारंग यांना पाठवली. त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत आपण त्यांना भेटून त्यांना झालेल्या नुकसानीचा भरपाई ची काहीतरी मदत करू असे सांगितले. परंतू दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सलीम सारंग यांना “मुंबईरत्न” पुरस्कार प्राप्त होणार होता. त्यामुळे अजित जाधव यांच्या मालाडच्या घरी जाऊन मदत करता आली नाही. परंतु २२ जुलै २०२१, गुरुवारी अजित जाधव यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांची आपुलकीने विचारपूस केली व मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. या आर्थिक मदती नंतर सिनेदिग्दर्शक अजित जाधव यांनी समाज माध्यमावर पोस्ट करून सारंग यांचे आभार मानले.
आपल्या परिचयाचे, नात्यातले, व विभागातले नसून सुद्धा एक माणुसकी म्हणून आर्थिक मदत केली. ही फार मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये नमूद केले.
सिनेदिग्दर्शक अजित जाधव ह्यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे.