चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना
कोकण किनारपट्टीवर उसळलेल्या जलप्रलयात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अशा संकटसमयी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. या अडचणीच्या परिस्थितीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने शनिवारीच महाड भागाकडे रवाना झाले असून त्यांनी त्याठिकाणी मदतकार्यास सुरूवात केलेली आहे.
मदतकार्याची वाढती गरज लक्षात घेऊन माणगांवच्या प्रांत श्रीम. प्रशांती दिघावकर यांच्या विनंतीनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने रविवारी स्वच्छता निरीक्षक श्री. विजय पडघन व उपस्वच्छता निरीक्षक श्री. दिपक शिंदे यांचेसह 20 स्वयंसेवकांचे आणखी एक मदतकार्य पथक आवश्यक साधनसामुग्रीसह महाडच्या दिशेने रवाना केले असून त्यांनीही तेथे पोहचून लगेच मदत कार्यवाहीस सुरूवात केलेली आहे. या पथकासोबत मिनी ट्रक, मिनी टिप्पर, 4 पाण्याचे टँकर, 2 टन कार्बोलिक पावडर पाठविण्यात आलेली आहे.
तसेच या पथकासमवेत लेट्स सेलिब्रेट फिटनेस या सेवाभावी संस्थेने तेथील आपद्ग्रस्तांसाठी 7 हजार लि. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, सतरंजी, ब्लॅंकेट, सॅनिटरी पॅड्स पॅकेट्स तसेच शेल्टर असो. या सेवाभावी संस्थेने 5000 अंघोळीचे साबण असे साहित्य पाठविलेले आहे.
कोकणातील अनेक भागांमध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. याकरिता तेथील शासकीय विभागांच्या मागणीनुसार आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता केली जात आहे. अशाचप्रकारे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय मदतकार्य पथक आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्यासह रविवार दि. 25 जुलै रोजी रात्री 11 वा. चिपळूणकडे रवाना झालेले आहे. डॉ. प्रशांत अहेर, डॉ. पंकज तितार, डॉ. उज्वल नाईक या वैद्यकीय अधिका-यांसह फार्मासिस्ट, ब्रदर, वॉर्डबॉय व स्वयंसेवक असे 12 जणांचे हे वैद्यकीय मदतकार्य पथक चिपळूणमध्ये तेथील आरोग्य जपणुकीचे काम करणार आहे.
imp