नवी मुंबई

बालदिनानिमित्त नवी मुंबईतील मुले साकारणार चित्रांतून स्वच्छतेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील स्वच्छ शहरांत असलेले तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सजगतेने काम करीत आहे. यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विदयार्थ्यांच्या मनातील स्वच्छतेविषयीच्या जाणीवा चित्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हाव्यात तसेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 रोजी, ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून स्वच्छतेकडे पुढचे पाऊल टाकले जात असताना निसर्ग उदयान, से.14, कोपरखैरणे येथे सकाळी 7.30 वा. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत आठवी ते दहावीचे विद्यार्थी विनाशूल्क प्रवेश घेऊ शकतात. स्पर्धा स्थळी मास्क, सुरक्षित अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी – (1) माझे शहर – माझा सहभाग, (2) प्लास्टिकमुक्त माझे शहर किंवा (3) स्वच्छतेचा बालमहोत्सव यापैकी एका विषयावर दोन तासाच्या कालावधीत चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धास्थळी महानगरपालिकेच्या वतीने कागद दिले जाणार असून त्याच कागदावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्याकरिता आवश्यक रंग तसेच पॅड व इतर पूरक साहित्य मुलांनी सोबत आणावयाचे आहे.

स्पर्धास्थळी आल्यानंतर मुलांनी आपल्या उपस्थितीची नोंद करावयाची असून दिला जाणारा नोंदणी क्रमांक काढलेल्या चित्राच्या कागदामागे लिहावयाचा आहे. स्पर्धेतील सर्वेोत्कृष्ट चित्रांना पारितोषिकाने गौरविण्यात येणार असून पहिल्या तीन क्रमाकांना अनुक्रमे रु.11 हजार, 7 हजार, 5 हजार याप्रमाणे रक्कम व शिक्षणोपयोगी साहित्य स्वरूपात पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच निवडक 10 चित्रकृतींना प्रत्येकी रु. 1 हजार रक्कमेची उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. या पुरस्कार व स्मृतीचिन्हांचे वितरण स्वतंत्ररित्या समारंभपूर्वक केले जाणार आहे. स्पर्धेविषयाच्या अधिक माहितीसाठी 9867922415 किंवा 9321525288 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमधील मानांकन उंचाविण्यात मुलांचाही महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील स्वच्छतेविषयीच्या संकल्पनांना मूर्त रूप यावे व त्यांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार व्हावा यादृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ ला सामोरे जात असताना ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धा’ या अभिनव उपक्रमात आठवी ते दहावीच्या विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे व शहर स्वच्छतेविषयीच्या आपल्या अभिनव संकल्पनांना चित्ररूप द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button