लिडार तंत्रज्ञानाव्दारे मालमत्ता सर्वेक्षण कार्यवाहीच्या प्रक्रियेचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात येत असून याबाबतच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला आणि जुलै अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित एजन्सीला दिले.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड व संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी एजन्सीमार्फत लिडारव्दारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या कार्यपध्दतीची सादरीकरणाव्दारे माहिती देण्यात आली. यामध्ये मालमत्तांचे प्रत्यक्ष जागी सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याकरिता विशिष्ट ॲपही तयार केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ड्रोनव्दारेही आकाशातून सर्वेक्षण करण्यात येणार असून ड्रोनव्दारे सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेली विविध विभागांची शासकीय मंजूरी मिळविण्याचे काम जलद गतीने कऱण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी जाणवल्यास महानगरपालिकेमार्फत सहकार्य करण्यात येईल असे आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेस मालमत्ता कराव्दारे मिळणा-या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिक सुधारण्याच्या दृष्टीने भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस मॅपींग) यावर आधारीत लिडार तंत्रज्ञानावर आधारीत सर्वेक्षण करण्यात येत आहे.
याव्दारे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्ता तसेच शहरातील जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या, पथदिवे, विविध नागरी सुविधा यांची माहिती अद्ययावत होणार असून या सर्वेक्षणाचा उपयोग महानगरपालिका क्षेत्रातील सर्वांगीण विकासाच्या नियोजनाकरिता उपयोगी होणार आहे. यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांबाबतची पूर्ण व अचूक माहिती महानगरपालिकेस उपलब्ध होऊन उत्पन्नात वाढ होणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये 360 डिग्रीमध्ये विस्तीर्ण सर्वेक्षण होणार असून यामध्ये मोबाईल मॅपींग सिस्टीम वापरून पायाभूत पातळीवरील प्रतिमा संपादित केली जाणार आहे. पायाभूत सर्वेक्षणासोबतच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा बेस मॅप अद्ययावत केला जाणार असून त्यासह इंटीग्रेशन केले जाणार आहे. हे सर्व करत असताना त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षगणनाही कऱण्यात यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
लिडार सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात होणा-या कामकाजाची सविस्तर माहिती घेतानाच आयुक्तांनी प्रत्येक टप्प्याच्या कार्यपूर्ततेसाठी किती कालावधी लागेल याचीही सविस्तर माहिती घेतली व याकालावधीत कार्यपूर्तता व्हावी यादृष्टीने काळजीपूर्वक व काटेकोर काम करावे असे संबंधित एजन्सीला निर्देशित केले व अभियांत्रिकी विभागास याबाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले. या कार्यवाहीतील प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थित व संपूर्ण लक्ष देण्यासाठी संबंधित अधिका-यांची समिती स्थापन करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
सदर माहिती संकलन व त्यावरील संपादनासाठी साधारणत: 100 कर्मचा-यांना हॅन्ड्स ऑफ ट्रेनिंग दिले जाणार असून साधारणत: 50 कर्मचा-यांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतची विस्तृत माहिती घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विहित कालावधीत व गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.