‘ब्रेक द चेन’ निर्बंधातील शिथिलतेमध्ये नागरिकांनी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – आयुक्त श्री. अभिजीत बांगर
– ब्रेक द चेन’ निर्बंधातील शिथिलतेमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्तांचे आवाहन*
– संभाव्य तिस-या लाटेतील पूर्वतयारीचा आयुक्तांकडून सविस्तर आढावा*
दैनंदिन कोरोनाबाधीतांची संख्या मागील आठवड्याभरापासून शंभराच्या खाली स्थिरावलेली दिसत असताना स्थानिक आरोग्य स्थितीचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासन निर्देशानुसार स्तर 2 करिताचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या निर्बंधांचे काटेकोर पालन होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा विषयनिहाय आढावा घेतला. या बैठकीस प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, श्री. योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड व परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.
‘ब्रेक द चेन’ करिता निर्बंधांचे 5 स्तर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका दुस-या स्तरात आहे. त्याबाबतचे नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीचे निर्बंध स्थानिक परिस्थितीनुसार शिथील करण्यात आले आहेत, त्यामुळे कोव्हीड प्रतिबंधासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही व मास्क, सुरक्षित अंतर अशा कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादृष्टीने विभाग पातळीवरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके यांनी कोव्हीड नियमांचे उल्लंघन होणार नाही याकरिता अधिक कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेशित करण्यात आले.
आपल्याकडील पहिल्या व दुस-या लाटेच्या प्रभावाचा तसेच इतर देशांमधील तिस-या लाटेच्या प्रभावाचा अभ्यास करता संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून त्याचा सुविधानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे तसेच औषध पुरवठा यांच्याही निविदा प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण कराव्यात असे आयुक्तांनी आदेशित केले.
दुस-या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती हे लक्षात घेत महानगरपालिकेच्या वतीने 4 ठिकाणी पोर्टेबल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून या कामाला गती द्यावी व विहित कालावधीत काम पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. खाजगी रुग्णालयांनीही त्यांना आवश्यक असलेला ऑक्सिजनची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
प्रत्येक विभागात पुरेशा बेड्स क्षमतेची कोव्हीड केअर सेंटर असावीत यादृष्टीने नियोजन करून पुढील बैठकीत तपशील सादर करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत आयसीयू बेड्स व व्हेन्टीलेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली होती. त्यामुळे महानगरपालिकेने कोव्हीड केद्रांकरिता तात्पुरत्या स्वरुपात भरती केलेल्या डॉक्टर्स, नर्सेस यांना आयसीयू कक्षात वैद्यकीय उपचार करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात असून त्यांची क्षमतावृध्दी करण्यात येत आहे. यामध्ये कोव्हीडच्या तिस-या लाटेत कोरोना बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक असणार आहे अशी शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने पिडीयाट्रीक आयसीयू कक्षामधील वैद्यकीय उपचारांबाबतही विशेष प्रशिक्षण देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करावी असे सूचित करीत आयुक्तांनी या डॉक्टर, नर्सेस प्रशिक्षणातील समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा असेही निर्देश दिले.
कोव्हीडच्या तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण व्हावे यादृष्टीने लस उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरणाला गती द्यावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या. संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या पूर्व तयारीबाबत महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी नियमित संवाद साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे तसेच त्यानुसार करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावाही आयुक्तांकडून नियमित घेतला जात आहे.
तरी नागरिकांनी संचारबंदी निर्बंधातील शिथिलतेमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे व आपल्या वर्तणुकीमुळे कोव्हीड प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.