नवी मुंबई

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमराव आंबेडकर नव्या मुंबईत

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

(नवी मुंबई) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या 109 जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख खाजमिया पटेल यांच्या नेतृत्वात जयंतीचे आयोजन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून ‘उदान’ हा शाहिरी जलसा चा कार्यक्रम ठेवण्यात आला. शाहीर बाबासाहेब आटकीळे व सहकारी यांचे प्रबोधन पर भीम गीते या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास बाबासाहेबांचे नातू व भैयासाहेबांचे द्वितीय सुपुत्र भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

नाट्यगृहाच्या गेट पासून स्वागत कर्त्यांनी मा. भिमराव आंबेडकर यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले आपल्या संयमी शैलीत भाष्य करताना सध्याचे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे राजकारण व बुद्धकालीन राजकारण दोन्ही समान असल्याचे बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकाचा दाखला देत सांगितले. बुद्ध काळात वैदिक संस्कृती विरुद्ध बौद्ध संस्कृती असे वैचारिक युद्ध चालू होते तोच प्रकार आजही घडत आहे, देशात संविधान सुरक्षित नाही संविधानाचे छेडले जात आहे, त्याविरोधात कोणी आवाज उठविल्यास त्याला तुरुंगात डांबले जात आहे हे वास्तव सांगत त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.

आर एस एस ने रवींद्र नाट्य मंदिर दादर येथे आयोजित केलेला अण्णाभाऊ साठे यांचा कार्यक्रम व त्या कार्यक्रमात मातंग यांनी जाती च्या दाखल्यावर हिंदू मातंग असे लिहावे असे आवाहन करण्यात आले याचे कारण महापुरुषाचे अनुयायी होण्यापासून पासून मातंगांना दूर करावे हा स्पष्ट हेतू दिसून येतो असे भीमराव आंबेडकर म्हणाले.

याशिवाय सध्याचे केंद्र सरकार लोकांना प्रथम घाबरवण्याचे काम करते. आणि नंतर निर्भय व्हा. असे म्हणते एकीकडून दबाव निर्माण करून दडपशाही प्रस्थापित करण्याचं राजकारण सध्याचे सरकार 2014 पासून करीत आहे असे ते म्हणाले महापुरुष मरतात परंतु त्यांचे विचार त्यांचे अनुयायी जगभरात पोचवितात त्याचा संदर्भ त्यांनी काल मार्क्स चे उदाहरण देऊन सांगितला, काल मार्क्स अंत्यसंस्काराच्या वेळी केवळ 14 लोक होते, परंतु आज बौद्ध बांधव 14 कोटी आहेत त्याच प्रमाणे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवण्याचे काम सूर्यपुत्र भैय्यासाहेब करत होते व तोच वारसा आम्ही चालवणार.

महापुरुषाचा सुपुत्र असणे हे बीरुद सोन्याचा मुकुट नसून हा मुकुट काटेरी असून त्याचा प्रत्यय कशाप्रकारे आला याचा उलगडा त्यांनी थोडक्यात केला चळवळ जिवंत ठेवत असताना भैय्यासाहेब व रिपब्लिकन पक्षाचे समकालीन नेते यांनी पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांचा पुतळा स्वनिधीतून उभा केला.
आजही लोकांना गैरसमज आहे की तो सरकारने उभारला होता. अशी सामाजिक कार्य पूर्णत्वास नेणे करिता त्यांनी 1962 मध्ये पंजाब व अहमदनगर येथून भैय्यासाहेबांनी निवडणूक लढविली पंजाबला वेळ कमी देता आल्याने केवळ आठ हजार मतांनी ते हरले. 1951 मध्ये बौद्धांची संख्या देशात अडीच हजार होती. 1956 ला मीडियाच्या आकडेवारीनुसार पाच लाख लोक धर्मांतरीत झाले. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 1961ला झालेल्या जनगणनेनुसार 27 लाख बौद्ध लोकांची नोंद केली गेली. याचे श्रेय भैय्यासाहेबांना जाते अशाच प्रकारे चैत्यभूमी ची निर्मिती महू ते चैत्यभूमी भिम ज्योती च्या माध्यमातून मशाल यात्रा काढली व निधी उभारून चैत्यभूमी निर्माण केली, सरकारची मदत घेतली नाही आजही सरकार चैत्यभूमीला मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले परंतु भारतीय बौद्ध महासभा सक्षम असून निधी कमी पडल्यास आंबेडकरी समाजाला आवाहन करेल असे म्हणाले. एकीकडे रिपब्लिकन पक्ष दुसरीकडे भारतीय बौद्ध महासभा अशा दोन्ही ठिकाणी भैय्यासाहेबांनी आपली भूमिका चोख बजावली.

अशाप्रकारे सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांच्या चळवळीसाठी केलेल्या कार्याची उजळणी करणे क्रमप्राप्त आहे असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणास पूर्णविराम दिला.

दरम्यान रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष दिवंगत नेते कुसाळकर साहेब यांना घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रकाश वानखडे, ज्येष्ठ नेते अशोक जमदाडे, उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, उपाध्यक्ष दादा भालेराव, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे युवा जिल्हा अध्यक्ष सुनील वानखडे, महापे विभाग प्रमुख यशवंत भालेराव, प्राध्यापक प्रकाश जाधव, समता सैनिक सुरेश पोते, दत्ता बनसोडे, राजेंद्र सरकटे, यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले.

सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील तमाम आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button