कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक शासकीय दाखले शिबीराला उत्तम प्रतिसाद, 21 सप्टेंबरला सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात दाखले शिबिराचे पुन्हा आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अनाथ मुले तसेच दिव्यांग व्यक्ती यांचेकरिता समाजविकास विभागाच्या वतीने विूविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात तसेच शासनामार्फतही कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले / प्रमाणपत्रे मिळविणे सोयीचे व्हावे याकरिता याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या सहयोगाने 15 सप्टेंबर रोजी सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजित विविध दाखले वितरण शिबिरात 66 नागरिकांनी नोंदणी करून हा उपक्रम यशस्वी केला.
यामध्ये रहिवासी दाखल्याकरिता 14, वय अधिवास दाखला (DOMICILE CERTIFICATE) करिता 10, उत्पन्न दाखला करिता 27 तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र करिता 15 नागरिकांनी कागदपत्रे दाखल करून नोंदणी केली. यामधील 37 नागरिकांना त्याच ठिकाणी त्यांचे दाखले / प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
अशाच प्रकारे दि. 21 सप्टेंबर 2021 रोजी सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुल याच ठिकाणी सकाळी 10.30 ते सायं. 4.30 या वेळेत हे विशेष शिबीर आणखी एकदा आयोजित करण्यात येत असून याठिकाणी रहिवासी दाखला, वय अधिवास दाखला (DOMICILE CERTIFICATE), उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची सुविधा असणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे शासकीय दाखले, प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध करून घ्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे.