बेडरिडन रूग्णांच्या कोव्हीड लसीकरणातही नवी मुंबई आघाडीवर, वृध्दाश्रमांमध्ये जाऊन 381 व्यक्तींचे लसीकरण
कोव्हीड लसीकरणाला वेग देताना कोणताही समाजघटक दुर्लक्षित राहू नये याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत असून बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्तींचे तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा काहीशा दुर्लक्षित भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील विविध वृध्दाश्रमांमधील वयोवृध्द व्यक्तींकरिता तेथे जाऊन लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आजारपणामुळे अथवा वृध्दापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्ती या महत्वाचा घटकाला घरोघरी जाऊन लसीकरण करण्याकडेही महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील विविध आश्रमांमध्ये असलेल्या बेडरिडन व्यक्तींच्या लसीकरणाला सेक्टर 17 ऐरोली येथील प्रेमदान आश्रमापासून सुरूवात करण्यात आली. ज्यामध्ये प्रेमदान 109 निराधार, वयोवृध्द व विविध व्याधींनी ग्रस्त तसेच बेडरिडन महिलांना कोव्हीड लसीकरण करण्यात आले. अशाच प्रकारे सेक्टर 8 ए सीबीडी बेलापूर येथील नर्मदा आश्रम व पारिजात आश्रमामधील 30 व्यक्तींना, सेक्टर 4 ऐरोली येथील साई सेवा आश्रमातील 10 व्यक्तींना, सेक्टर 1 कोपरखैरणे येथील स्वीट ओल्ड एज होम आणि सदानंद ओल्ड एज होम मधील 10 व्यक्तींना, सेक्टर 21 नेरूळ येथील गुरूकृपा ओल्डेज होम मधील 33 व्यक्तींना, सेक्टर 48 नेरूळ येथील बेथल गॉ़स्पीक चॅरिटेबल ट्रस्ट मधील 30 व्यक्तींना, सेक्टर 17 नेरूळ येथील गुरूकृपा ओल्डेज होम मधील 9 व्यक्तींना तसेच वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथील 150 व्यक्तींना अशाप्रकारे विविध वृध्दाश्रमांतील एकूण 381 व्यक्तींना कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जे रूग्ण अंथरूणाला खिळलेले आहेत व ज्यांना शारीरिक हालचाल करता येत नाही असे बेडरिडन रूग्ण लसीकरणापासून वंचित राहू नयेत याची काळजी घेत घरोघरी जाऊन त्यांचे लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे, या विशेष उपक्रमांतर्गात आत्तापर्यंत 169 बेडरिडन रूग्णांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आलेले आहे.
बेडरिडन रूग्णांच्या लसीकरणाबाबत सर्व महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांना महापालिका आयुक्तांमार्फत आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यास अनुसरून सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेडरिडन रूग्णांची माहिती ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ए.एन.एम.) व आशा वर्कर यांच्यामार्फत संकलित करून घरोघरी लसीकरणास सुरूवात केलेली आहे. यामध्ये त्या बेडरिडन रूग्णावर उपचार करीत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र घेण्यात येत असून सदर व्यक्ती लस घेण्यास तयार असल्याचे संमतीपत्र घेण्यात येत आहे.
अशाप्रकारे कोव्हीड लसीकरणामध्ये कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याची काळजी घेत महानगरपालिकेच्या वतीने लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले जात आहे. एखाद्या कुटुंबात बेडरिडन रूग्ण असल्यास त्यांच्या लसीकरणासाठी कुटुंबियांनी नजिकच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अथवा महानगरपालिकेच्या कोव्हीड कॉल सेंटरच्या 022-27567460 या क्रमांकावर संपर्क साधून बेडरिडन रूग्णाची माहिती द्यावी व बेडरिडन रूग्णांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.