एपीएमसी भाजी मार्केटला मध्यरात्री भेट देत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये केवळ मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून व इतरही राज्यातून जीवनावश्यक वस्तूंची आवक-जावक होत असल्याने कोरोना संसर्ग प्रसाराच्या दृष्टीने हे अत्यंत जोखमीचे क्षेत्र आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळे, कांदाबटाटा, दाणाबाजार, मसाला अशा पाचही मार्केटकडे नवी मुंबई महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी रात्री 12 नंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये अचानक भेट देत तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी आयुक्तांसमवेत परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होत. भाजीपाला मार्केटच्या बदललेल्या वेळेनुसार साधारणत: 10 वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरातून ट्रकमधून भाजीपाला मार्केटमध्ये येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व मार्केट्समध्ये तेथील कामाच्या वेळांनुसार तिन्ही शिफ्टमध्ये कोव्हीड टेस्टींग करण्यात येत आहे. आयुक्तांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशव्दाराजवळील कोव्हीड टेस्टींग सेंटरचीही पाहणी केली व तेथील कार्यवाहीचा आढावा घेतला.
या अनपेक्षित भेटीप्रसंगी मार्केट परिसरात गाळ्यांच्या अंतर्गत भागात फिरताना ट्रकमधून माल उतरविणा-या व उतरवून घेणा-या बहुतांश व्यक्तींकडे मास्क होते, मात्र अनेकांच्या ते नाकाखाली अथवा गळ्यात लटकवलेले असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. याबाबत तेथील सुरक्षारक्षक प्रमुखांना निर्देश देत आयुक्तांनी प्रवेशव्दारातून भाजीपाला घेऊन येणा-या ट्रकला प्रवेश देतानाच चालक, क्लिनर व ट्रकसोबत आलेले कामगार यांचा निगेटिव्ह कोव्हीड टेस्ट रिपोर्ट त्यांच्यासोबत आहे काय हे कटाक्षाने तपासावे तसेच तो नसल्यास त्यांची प्रवेशव्दाराजवळ लगेच ॲन्टिजन टेस्ट करून घ्यावी व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना व ट्रकला आत प्रवेश देण्याची कार्यवाही करावी असे सुरक्षारक्षक पथकास निर्देशित करण्यात आले.
या पाहणीमध्ये केवळ महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान अशा इतर राज्यांतूनही भाजीपाला घेऊन याठिकाणी ट्रक येत असल्याची बाब आयुक्तांच्या प्रामुख्याने निदर्शनास आली. इतर राज्यांतून कोरोनाचा विषाणू नवी मुंबईत पसरू नये याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देत मार्केट आवारात प्रवेश देताना कोव्हीड टेस्टींग अधिक काटेकोरपणे बंधनकारक करावे याबाबत एपीएमसी प्रशासनाला आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात येत आहे.
आजपासून एपीएमसी मार्केटमध्ये कोव्हीड लसीकरणासही सुरुवात होत असून एपीएमसी मार्केट संबंधीत 45 वर्षावरील सर्व घटकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे व एपीएमसी प्रशासनाने यादृष्टीने नियोजन करावे असेही निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने देण्यात आलेले आहे.