नवी मुंबई

अनंत चतुर्दशीदिनी 5933 श्रीगणेशमूर्तींना “गणपती बाप्पा मोरया” च्या गजरात भावपूर्ण निरोप

कृत्रिम तलावांना तसेच विसर्जन बुकींग स्लॉटला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर 10 ते 19 सप्टेंबर कालावधीत यावर्षीचा श्रीगणेशोत्सव शासकीय सूचनांचे पालन करून आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नियमांच्या चौकटीत संपन्न झाला. भाविकांनी अत्यंत आत्मियतेने, ‘संपूर्ण विश्वावरील हे कोरोनाचे संकट दूर करा’ अशी इच्छा व्यक्त करीत, आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये ‘पुढल्या वर्षी लवकर या’ अशी श्रीगणरायाकडे प्रार्थना केली आणि विसर्जनाच्या इतर 3 दिवसांप्रमाणेच अनंतचतुर्दशीदिनीही भक्तीमय अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप दिला.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकुण 5843 घरगुती व 90 सार्वजनिक अशा एकूण 5933 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यामध्ये पारंपारिक 22 मुख्य विसर्जन स्थळांवर 3421 घरगुती तसेच 76 सार्वजनिक अशा 3497 श्रीमूर्तींचे तसेच कोव्हीड 19 चा पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याकरिता यावर्षी मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या 151 कृत्रिम विसर्जन तलावांना प्राधान्याने पसंती देत 2422 घरगुती व 14 सार्वजनिक अशा 2436 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पारंपारिक मुख्य 22 विसर्जन स्थळांवर –
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 895 घरगुती व 07 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 640 घरगुती व 16 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 445 घरगुती व 06 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 557 घरगुती व 12 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 56 घरगुती, 23 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 354 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 474 घरगुती व 07 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,

अशा रितीने एकूण 21 विसर्जन स्थळांवर 3421 घरगुती व 76 सार्वजनिक अशा एकूण 3497 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. दिघा विभागात पारंपारिक विसर्जन तलावावर विसर्जन न करता नागरिकांनी कृत्रिम तलावावरील विसर्जनाला पसंती दिली.

त्याचप्रमाणे कोव्हीड 19 प्रसार प्रतिबंधाच्या दृष्टीने गर्दी टाळणे व सुरक्षित अंतर राखले जाणे याकरिता मागील वर्षीपेक्षा 16 अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करून एकूण 151 इतक्या मोठ्या संख्येने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर,

बेलापूर विभागात – 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 188 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 191 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 171 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 20 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 196 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 907 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 252 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 23 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 236 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 281 घरगुती श्रीगणेशमूर्ती

अशाप्रकारे एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2422 घरगुती व 14 सार्वजनिक अशा एकूण 2436 श्रीगणेशमुर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनस्थळांवर नियोजनबध्द व्यवस्था:
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त व सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस यंत्रणा व वाहतुक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.

महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुख्य विसर्जनस्थळांवर ध्वनीक्षेपकाव्दारे श्रीगणेशभक्तांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना विसर्जनाच्या दृष्टीने मौलिक सूचना देण्यात येत होत्या. त्याठिकाणी श्रीगणेशमुर्ती विसर्जनाकरीता तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर बांबूचे बॅरॅकेटींग करण्यात आले होते. तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.

पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व विसर्जनस्थळांवर 1 हजारहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्डस् दक्षतेने तैनात होते. शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य केले.

भाविकांनी यशस्वी केला कृत्रिम विसर्जन तलावांचा नवी मुंबई पॅटर्न:
पारंपारिक विसर्जन तलावांप्रमाणेच मागील वर्षीच्या संख्येत 16 ने वाढ करीत विभागवार 151 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांना पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत नागरिकांनी प्राधान्याने पसंती दिली. विभाग कार्यालयांच्या वतीनेही पारंपारिक विसर्जन स्थळांवर नैसर्गिक जलस्त्रोतांच्या रक्षणासाठी नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन करावे असे आवाहन करणारे फलक विसर्जनसाठी येणा-या भाविकांपुढे स्वयंसेवकांव्दारे प्रदर्शित करण्यात येत होते. दीड, पाच, गौरीसह सहा, सात आणि अनंतचतुर्दशी दिन अशा पाच विसर्जन दिवसांमध्ये एकूण 28969 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 13914 श्रीमूर्ती या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या. म्हणजेच 48 टक्के नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करून स्वयंशिस्तीचे व पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले. दिघा विभागात पारंपारिक विसर्जन स्थळावर एकही मूर्ती विसर्जन न करता भाविकांनी कृत्रिम विसर्जन स्थळांवरच श्रीमूर्तींचे विसर्जन केले.

त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी मंगलमय वातावरणात घरीच श्रध्दापूर्वक श्रीमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जन स्थळांवर आलेले बहुतांशी नागरिक श्रींची निरोपाची आरती घरीच करून मर्यादित व्यक्तींसह विसर्जनस्थळी आल्याचे चित्र पहावयास मिळाले अत्यंत शांततेने व सुनियोजित पध्दतीने हा विसर्जन सोहळा मनोभावे पार पडला.

ऑनलाईन विसर्जन स्लॉट नोंदणीलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद:
विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये आणि भाविकांना त्यांच्या सोयीच्या वेळी व स्थळी सुलभपणे श्रीमूर्ती विसर्जन करता यावे याकरिता प्रथमत:च कार्यान्वित करण्यात आलेल्या nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ विशेष पोर्टलला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सवामध्ये 1174 नागरिकांनी आपले ऑनलाईन विसर्जन स्लॉट बुकींग केले व ही संकल्पना यशस्वी केली.

50 टन 330 किलो निर्माल्यातून होणार नैसर्गिक खतनिर्मिती:
सर्व 22 पारंपारिक आणि 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक घ्यावयाची काळजी तसेच स्वच्छतेविषयी आवाहन करणारे होर्डींग प्रदर्शित करण्यात येऊन शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार गायक श्री. शंकर महादेवन यांच्या आवाजातील जिंगल्स विसर्जनस्थळी प्रसारित करून जनजागृती करण्यात आली तसेच ओला-सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाची हस्तपत्रकेही वितरित करण्यात आली.

सर्व विसर्जनस्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. अनंत चतुर्दशीदिनी 10 टन 415 किलो निर्माल्य जमा झाले असून दीड दिवसापासून अनंतचतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत एकूण 50 टन 330 किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्र खत निर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.

कोव्हीड 19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मंगलमूर्ती गणरायाचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी मौलिक सहकार्य केले. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व विभागांमध्ये नागरिकांच्या घराजवळ सोयीच्या ठिकाणी 151 इतक्या मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांनी पसंती दर्शविल्याने गर्दी विभागली जाऊन कोव्हीड 19 विषयक नियमांचे पालन झाले, पर्यावरण संरक्षण झाले तसेच व्यवस्थेवरील ताणही कमी झाला. सर्वांच्या सहकार्यामुळेच महापालिका क्षेत्रातील विसर्जनसोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला याबद्दस महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button