सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिकांमध्ये वाढ, 45 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका कार्यरत
कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढत असलेली संख्या लक्षात घेता कोरोना बाधितांना नागरी आरोग्य केंद्रातून कोव्हीड केंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये व कमीत कमी कालावधीत त्यांना कोव्हीड केंद्रामध्ये दाखल होण्यासाठी जाता यावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रासाठी बस स्वरूपातील रूग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात आलेली आहे.
आता महानगरपालिकेच्या 45 रूग्णवाहिकेत रूपांतरित केलेल्या एनएमएमटी बसेस कोरोनाबाधितांना नागरी आरोग्य केंद्रातून कोव्हीड केंद्रात ये-जा करण्यासाठी अथक कार्यरत करण्यात आलेल्या आहेत व त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातून कोरोना बाधितांना कोव्हीड केंद्रात दाखल करण्यासाठी नेण्याकरिता एनएनएमटीच्या बसेसचे रूपांतर कोव्हीड रूग्णवाहिकेत करण्यात आलेले असून सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध रूग्णवाहिकांमध्ये वाढ करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकांमध्ये वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार सद्यस्थितीत 45 रूग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील लोकसंख्येचा विचार करून त्यामध्ये वाढ केली जात आहे. त्यानुसार काही मोठ्या लोकसंख्येच्या नागरी आरोग्य केंद्रांना 3 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका तातडीने देण्यात येत आहेत.
यामुळे जसजसे रूग्ण नागरी आरोग्य केंद्रात येतील तसतसे त्यांना टप्प्याटप्प्याने कोव्हीड केंद्रात दाखल होण्यासाठी पाठविणे शक्य होणार आहे. याव्दारे कोरोनाबाधितांचा प्रवासातील वेळ कमी होणार असून कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्याची प्रक्रियाही अधिक जलद करण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व कोव्हीड केंद्रांच्या नोडल अधिका-यांना दिलेले आहेत.
कोव्हीड रूग्णांकरिता महानगरपालिकेमार्फत 26 अद्ययावत रूग्णवाहिकांसह आता 45 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका सुसज्ज असून यमाध्ये तातडीने आणखी वाढ करण्यात येत आहे व याव्दारे कोव्हीड रूग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. बेड्सप्रमाणेच रूग्णवाहिका उपलब्धतेमध्येही नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये याकरिता 022-27567460 हा 24 X 7 दिवसरात्र कार्यरत असणारा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.