नवी मुंबई

ऐरोली ते काटई नाका रस्त्याचा उपयोग नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने होण्यासाठी आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्यामार्फत एमएमआरडीए व महापालिका अधिका-यांच्या संयुक्त बैठकीत नियोजन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ (MMRDA) यांच्या मार्फत बांधण्यात येणा-या ऐरोली ते काटई नाका या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी व नियोजनामध्ये अतिरिक्त सुविधा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यामार्फत महानगरपालिका व एमएमआरडीए यांच्या संबंधित अधिका-यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश भांगरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता श्री. विनय सुर्वे व श्री. गुरुदत्त राठोड, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. संजय खताळ तसेच प्रकल्प सल्लागार आकार अभिनव कन्सल्टन्ट चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमोल खेर, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. दिपक शेंडे व महाव्यवस्थापक श्री. किशोर कोटकर उपस्थित होते.

नवी मुंबईतील घणसोली, रबाळे, ऐऱोली, दिघा परिसरातील वाहन चालकांना कल्याण – डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शिळफाटा – महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून कल्याण – डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करताना घ्यावा लागणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली – काटई नाका अशा उन्नत आणि भूमिगत मार्गाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे.

सदर रस्त्याचे काम गतीमानतेने सुरु असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे बेलापूर मार्गावर सेक्टर 3 ऐरोली येथील महानगरपालिकेकडे हस्तांतरीत असलेल्या जागांमधील सदर प्रकल्पासाठी एमएमआरडीएला आवश्यक असणा-या जागा उपलब्ध करून देणेबाबत या बैठकीत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सेक्टर 3 ऐरोली येथील उद्यानाचा काही भाग, अग्निशमन केंद्र परिसराचा काही भाग तसेच ऐरोली बस डेपोचा काही भाग उपलब्ध करून देण्यास व काम झाल्यानंतर तो पूर्ववत करण्याचे एमएमआरडीए मार्फत मान्य करण्यात आले.

नवी मुंबईकर नागरिकांना या पूलाचा वापर करता यावा याकरिता ठाणे बेलापूर रोडवरून कल्याण – डोंबिवलीकडे जाण्यासाठी व कल्याण डोंबिवलीकडून ठाणे बेलापूर रोडवरून नवी मुंबईत उतरण्यासाठी एमएमआरडीएच्या नियोजनात मार्गिका उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका एमएमआरडीए मार्फत नवीन नियोजनात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या मार्गिकांची तांत्रिक व्यवहार्यता तपासून 15 जानेवारीपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आयुक्तांमार्फत प्रकल्प सल्लागार यांना सूचित करण्यात आले तसेच याविषयी पुन्हा 18 जानेवारी रोजी एमएमआरडीए अधिका-यांसोबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्याकरिता एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यांचे स्तरावर बैठक आयोजनाबाबत विनंती करण्यात येणार आहे.

तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतुक विनाअडथळा व्हावी याकरिता भविष्यात भारत बिजली जंक्शन जवळ उन्नत मार्गावर उड्डाणपूल बांधण्यातील अडचणी तपासणे व तांत्रिक अहवाल तपासणी करणेविषयी प्रकल्प सल्लागार यांना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत सूचित करण्यात आले.

ऐरोली ते मुंब्रा दरम्यान पारसिक डोंगराखालून जाणारा भुयारी मार्ग आणि उन्नत मार्गाचे काम गतीमानतेने सुरु असून या मार्गाचा उपयोग ठाणे बेलापूर रोडवरून मुंबईकडे व कल्याण – डोंबिवलीकडे येण्या-जाण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने व्हावा या भूमिकेतून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी एमएमआरडीए व महापालिकेच्या संबंधित अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित करून या कामाला गतीमानता दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button