दिवाळीनंतर नवी मुंबईकर नागरिकांचा कोव्हीड लसीकरणाला उत्साही प्रतिसाद
कोव्हीड लसीकरणात पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करून घेऊन आता दुस-या डोसच्या 57 टक्के झालेल्या लसीकरणाला अधिक वेग देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य नियोजन केलेले आहे. या अनुषंगाने दिवाळी उत्सवाच्या कालावधीतही नागरिकांची लसीकरणाविषयी अडचण होऊ नये याकरिता महानगरपालिकेच्या चारही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवाळीच्या दिवसात सुरू ठेवण्यात आली होती.
आता दिवाळी सणानंतर पुन्हा एकवार नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून आले असून आज कार्यान्वित महानगरपालिकेच्या 35 लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहात कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतला. दिवाळी सणानंतरच्या आजच्या पहिल्या दिवसात महानगरपालिका व खाजगी अशा सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिक सकाळपासून उपस्थित होते. यामध्ये आजच्या दिवसात 1815 नागरिकांनी पहिला तसेच 7945 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. अशाप्रकारे आज एकूण 9760 नागरिकांचे लसीकरण झाले.
दिवाळीच्या दिवसातही वाशी, नेरूळ, ऐरोली व तुर्भे रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 4 नोव्हेंबर या नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 290 नागरिकांनी, 5 नोव्हेंबर या बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या दिवशी 760 नागरिकांनी तसेच 6 नोव्हेंबर या भाऊबीजेच्या दिवशी 1203 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. रविवारी 7 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 819 नागरिकांनी लसीचे डोस घेतले. अशाप्रकारे दिपोत्सव कालावधीत एकूण 3072 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दिवाळी सणाच्या दिवसात लस घेऊ इच्छिणा-या नागरिकांची असुविधा होऊ नये म्हणून 4 रूग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू ठेवल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस विहित वेळेत घ्यावा याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून कॉल सेंटरव्दारे दुस-या डोसचा कालावधी उलटून गेलेल्या किंवा जवळ असलेल्या नागरिकांची सूची तयार करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांशी दूरध्वनीव्दारे संवाद साधत त्यांना दुस-या डोसबाबत अवगत करण्यात येत आहे तसेच दुसरा डोस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फतही स्थानिक पातळीवर नागरिकांपर्यंत पोहचण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहे. त्यानुसार आता दिवाळी सणानंतर लसीकरण केंद्रांवरील नागरिकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.
ज्या नागरिकांनी कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला असेल त्यांनी 84 दिवसानंतर कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस घ्यावयचा आहे तसेच ज्यांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे. एखाद्या व्यक्तीने खाजगी रूग्णालय अथवा कँम्पमध्ये किंवा इतर शहरांत लसीचा पहिला डोस घेतला असेल तरी त्याच लसीचा दुसरा डोस नवी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर घेता येईल याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावयाची आहे.
आत्तापर्यंत 11 लाख 29 हजार 547 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 6 लाख 32 हजार 299 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. म्हणजेच 57.11 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला असून सर्व नागरिकांनी विहित वेळेत दुसरा डोस घ्यावा याकरिता महानगरपालिका विविध माध्यमांतून प्रयत्नशील आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतले तरच लस कोव्हीड विरोधातील लढाईत अत्यंत प्रभावीपणे काम करते हे लक्षात घेऊन ज्या नागरिकांचा दुसरा डोस घ्यायचा विहित कालावधी आला असेल त्यांनी तो त्वरित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यांच्या वतीने करण्यात येत आहे.