आधारकार्ड नसलेल्या 93 नागरिकांनी घेतला विशेष कोव्हीड लसीकरण सत्राचा लाभ
कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार योग्य नियोजन व 101 इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे सुरू केल्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील 97 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिक लस संरक्षित व्हावेत हा महानगरपालिकेचा प्रयत्न असून कोणताही घटक लसीकरणापासून वंचित राहू नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार दिनांक ९ रोजी महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय आणि ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयामध्ये आधार कार्ड नाही अशा नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आधार कार्ड नाही म्हणून कोणताही व्यक्ती कोव्हीड लस घेण्यापासून वंचित राहू नये या भूमिकेतून या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे आधार कार्ड नसलेल्या 20 पुरूष व 33 महिला अशा 53 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ रूग्णालय, ऐरोली येथे 24 पुरूष व 16 महिला अशा 40 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अशाप्रकारे आजच्या आधारकार्ड नसलेल्या नागरिकांसाठीच्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ 93 नागरिकांनी घेतला.
कोणताही घटक कोव्हीड लसीकरणापासून वंचित राहू नये याची काळजी सुरूवातीपासूनच घेण्यात आलेली असून दुर्गम कॉरी क्षेत्र, रेडलाईट एरिया, बेघर व निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय, दिव्यांग, अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्ती अशा विविध समाज घटकांचे विशेष सत्र राबवून लसीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पंप, टोल नाका याठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा – टॅक्सी चालक, सोसायट्यांचे वॉचमन, घरकाम करणारे महिला – पुरूष कामगार अशा मोठ्या प्रमाणावर नागरिकांशी संपर्क येणा-या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिताही (Potential Superspreaders) विशेष लसीकरण सत्रांचे सातत्याने आयोजन केले जात आहे.