नवी मुंबई

तिस-या लाटेसाठी करावयाची कामे गुणवत्तापूर्ण व गतीमानतेने करण्याचे आयुक्तांचे आदेश

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द पावले उचलत असून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मागील आठवड्यातील बैठकीत केलेल्या सूचनांवरील अंमलबजावणीचा आजच्या विशेष बैठकीत आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उप आयुक्त श्री. योगेश कडुसकर, सिडको कोव्हीड सेंटरचे नोडल अधिकारी श्री. निलेश नलावडे उपस्थित होते.

कोव्हिडची साधारणत: ऑगस्ट महिन्यात येणारी संभाव्य तिसरी लाट अधिक तीव्र स्वरुपाची असेल असा अंदाज जागतिक स्तरावरील आरोग्य स्थितीचा आढावा घेऊन तज्ज्ञांमार्फत व्यक्त करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने कोणतीही लक्षणे नसलेल्या व सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोरोना बाधीतांसाठी कोव्हीड केअर सेंटर, लक्षणे असलेल्या अथवा ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना बाधीतांसाठी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर तसेच गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या अथवा आयसीयू बेड्सची गरज असलेल्या कोरोना बाधीतांसाठी डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल अशा तिन्ही कोव्हीड सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्यवाहीचा सुविधानिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी तौक्ते वादळाच्या अनुषंगाने आज अचानक उद्भवलेल्या पावसाळी परिस्थितीमध्ये आलेल्या अनुभवांच्या अनुषंगाने कोव्हीड सेंटर्स मधील आवश्यक कामे 25 मे पूर्वी तातडीने पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच नव्याने सुरु करावयाच्या कोव्हीड सेंटर्सची सर्व कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण व्हावीत असे आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास आदेशीत केले. स्थापत्य विषयक कामे निविदा सूचनेतील विहीत कालावधीच्या आधी पूर्ण करणा-या एजन्सींना प्रोत्साहन द्यावे अथवा विहित कालावधीपेक्षा उशीरा काम झाले तर दिवसागणिक दंड आकारावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. तिस-या लाटेत कोरोना बाधीतांच्या संख्येत बालकांचे प्रमाण अधिक असेल या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तशा प्रकारच्या कोव्हीड सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व गोष्टींची तजवीज करावी, अगदी व्हेन्टिलेटरही बालकांसाठी पूरक असावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

सुविधा निर्मितीप्रमाणेच मनुष्यबळ व्यवस्थापन, आवश्यक उपकरणे खरेदी, औषधे खरेदी व नर्सेससह इतर आरोग्य कर्मचा-यांचे बालकांवर उपचार करण्याच्या दृष्टीने आत्ताच प्रशिक्षण याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

दुस-या लाटेतील अनुभव लक्षात घेता ऑक्सिजनचा पुरवठा ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे अधोरेखीत करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऑक्सिजन स्टोरेज टॅंक व ऑक्सिजन प्लान्ट पूर्ततेच्या दृष्टीनेही गतीमान कार्यवाही करण्याचे सूचित केले. यासोबतच महानगरपालिकेचे सर्वोत्तम कोव्हीड सेंटर म्हणून नावाजल्या गेलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दरम्यानच्या कालावधीत आवश्यक सुधारणा तातडीने करून घ्याव्यात असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना कामात गुणवत्ता राखण्याप्रमाणेच कोव्हीड केंटर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कामात गतीमानता राखणेही गरजेचे असून त्यादृष्टीने नियोजनबध्द पध्दतीने कामे करावीत असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य व अभियांत्रीकी विभागाला निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button