मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत झाले स्वयंपूर्ण
अवघ्या तीन दिवसांच्या विक्रमी वेळेत उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लँट, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मीरा भाईंदर: अवघ्या तीन दिवसांत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आता स्वयंपूर्ण झाले असल्याचं मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं लोकार्पण करण्यात आले.
ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटर मध्ये अवघ्या १० दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणाऱ्या एअर सिप कंपनीनेच यावेळी अवघ्या तीन दिवसांत मीरा- भाईंदर मधील हा प्लांट उभारून तो कार्यान्वित केलेला आहे. या प्लँटद्वारे दररोज १७५ जंबो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल व त्याद्वारे दररोज १२० रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यात येणार आहे. वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून 93 टक्के शुद्ध ऑक्सिजन या प्लांटद्वारे तयार केला जाणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याला सध्या श्री. शिंदे यांनी प्राधान्य दिलं असून त्यामुळे आगामी काळात एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारले जाणार आहेत.
आज मुसळधार पाऊस असूनही करण्यात आलेल्या या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उदघाटनाला पालकमंत्री श्री शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलिस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, महापालिका आयुक्त दिलीप ढोले उपस्थित होते.