नवी मुंबईतील नाले व बंदिस्त गटारे सफाई कामांना वेग
पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीमध्ये महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी शहरातील सर्व नैसर्गिक खुल्या नाल्यांची तसेच बंदिस्त गटारांच्या सफाईची कामे 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्याने या साफसफाई कामांना वेग आलेला आहे. आज घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई या दोन्ही विभागप्रमुखांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कामांची संयुक्तपणे पाहणी करून कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.
यामध्ये नालेसफाई करताना नाल्याच्या प्रवाहात लावलेल्या जाळ्या काढून ठेवाव्यात अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे बंदिस्त गटारांची सफाई देखील जलद करावी व सफाई करताना काढण्यात आलेला गाळ जरासा सुकल्यानंतर लगेच 24 तासात उचलून घेण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले.
ही सफाई कामे गतिमानतेने करण्यात येत असून नैसर्गिक खुले नाले सफाईचे काम 45 टक्के व बंदिस्त गटारे सफाईचे काम 60 टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगत आयुक्तांनी दिलेल्या काल मर्यादेमध्ये ही कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे या दोन्ही विभागप्रमुखांनी पाहणीनंतर सांगितले.