आमदार रमेश कोरगावकर यांनी ‘एस’ वॉर्डसाठी दिलेल्या 2 रुग्णवाहिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्त
– कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली तरीही तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहण्याचं श्री. शिंदे यांचं आवाहन:
– शिवसेना आणि रुग्णवाहिका हे नाते प्रत्येक संकटात अबाधित असल्याची श्री.शिंदे यांची ग्वाही:
मुंबई: १० मे २०२१
कोरोनाची रुग्णसंख्या सध्या कमी होत असली तरीही गाफिल राहून चालणार नाही. आगामी काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे व तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे कोविडचा पुर्ण नायनाट होईपर्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी एस वॉर्ड साठी दिलेल्या 2 रुग्णवाहिका आज त्यांच्या हस्ते प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची लॉकडाऊनची सूचना अंमलात आणल्याने कोविडचे रुग्ण कमी होण्यात यश मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे पालन करावे अस आवाहन श्री. शिंदे यांनी केले. शिवसेनेचे व रुग्णवाहिकेचे कायमच एक वेगळे नाते आहे. संकटकाळात सर्वांना शिवसेनेच्या रुग्णवाहिका आठवतात आणि त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्य मिळते. अभिनेता अमिताभ बच्चन यांना जेव्हा रुग्णवाहिकेची गरज भासली तेव्हा देखील त्यांना शिवसेनेचीच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
कोविडच्या पहिल्या लाटेत आपल्या सगळ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रुग्णालयात बेड मिळवण्यापासून प्रत्येक बाबीसाठी अनेकांना धावपळ करावी लागली मात्र काही काळानंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने कोरोनाचे संकट गेल्यासारखे वाटले. मात्र प्रत्यक्षात पुन्हा कोरोनाची लाट आली त्यामुळे आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी गाफिल राहून चालणार नाही. सरकारच्या निर्देशांचे पालन करुन सुरक्षित राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
आमदार रमेश कोरगावकर यांनी आमदार निधीतून हा चांगला समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. रुग्णवाहिकेचा वापर कमीत कमी व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. मात्र जेव्हा रुग्णाला रुग्णवाहिकेची गरज भासेल तेव्हा तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होईल, याकडे लक्ष देण्याची सूचना मंत्री महोदयांनी केली.
यावेळी आमदार रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, माजी खासदार संजय पाटील, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर, प्रभाग समिती अध्यक्षा दिपमाला बढे, नगरसेविका दिपाली गोसावी, सुवर्णा करंजे, महिला विभाग संघटक संध्या वढावकर, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर उपस्थित होते.