गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा: विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे
नवी मुंबई:
नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक / अध्यक्ष तथा नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बागंर यांच्याकडे केली आहे.
नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरात पावसाळी पूर्व कामांअंर्तगत महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना त्यातील माती व गटारात तुंबलेला कचरा काढण्यात आला. त्याबाबत सर्वप्रथम आपले नेरुळगांवच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर २० मधील रहीवाशांकडून मनापासून विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी आभार मानले. नेरुळगांव व नेरूळ सेक्टर विस परिसरातील गटारांची सफाई करावी यासाठी विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाला निवेदनही सादर केले होते.
महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना जो गाळ, कचरा बाहेर काढला, त्यालाही आता सहा-सात दिवस उलटून गेले आहेत. गटारातून बाहेर काढलेला गाळ, कचरा आता सुकला असून त्याची दुर्गंधी आता ग्रामस्थांना व रहीवाशांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाच काळ आहे. आमच्या परिसरात आनेक कोरोनाचे रूग्ण सापडले आहे. परिसरातील रहीवाशांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच या दुर्गंधी पसरल्याने लोकांमध्ये आजार वाढण्याची भीती आहे. ही समस्या दोन दिवसापूर्वीच पालिका नेरूळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून देवूनही कचरा व मातीचे ढिगारे अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरालाही बकालपणा आलेला असल्याचे विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
लोक नाराज आहेत. कोरोनाच्या भीतीखाली वावरत आहेत. त्यातच आता कचऱ्याच्या सुकलेल्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहून आपण पालिकेच्या संबंधित विभागाला सेक्टर २० परिसरातील व नेरुळगांवतील गटारांच्या बाजूलाच ठेवलेले मातीचे ढिगारे व कचरा हटविण्याचे आदेश देण्याची मागणी विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी केली आहे.
विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांनी लेखीनेवेदनाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजित बागंर यांच्याकडे ही तक्रार करताच त्यांनी अवघ्या काही मिनिटात विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेत उपायुक्त यांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश दिले.