पालकमंत्री अदिती तटकरे यांची वॉर रूम आणि प्रस्तावित सिडको जंबो कोविड सेंटरला भेट:
पनवेल प्रतिनिधी:
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णालयांची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी आणि कोणीही उपचाराविना राहू नये यासाठी पालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कोरोना वॉर रुमला 10 मे रोजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. पालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सुरू असलेल्या वॉर रुमच्या भेटीवेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि नियोजनाविषयीचा आढावा घेतला.
यावेळी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे उपस्थित होते.
यावेळी पालिकेच्या 24 तास बेड उपलब्धीसाठी कार्यरत असणाऱ्या नियंत्रण पथकाव्दारे संबधित रुग्णांना होणाऱ्या त्रासावरुन त्यांना गृह विलगीकरणाची गरज आहे का रुग्णालयात भरती होण्याची गरज आहे आणि असल्यास रुग्णालयाची माहिती रुग्णांना मोबाईलव्दारे देण्यात येते अशी माहिती पालकमंत्री तटकरे यांना पथकाने दिली. खासगी व सरकारी रूग्णालयातरील व्हेटिलेटर, ऑक्सीजन बेड उपलब्धतेविषयीची माहिती हे पथक देत असते. तसेच प्रत्येक रुग्णालयाची माहिती संकलित करणाऱ्या डॅशबोर्डविषयी माहिती देण्यात आली.
या ठिकाणी आयसीएमआरकडून आलेल्या बाधित रूग्णांची संपूर्ण माहिती नोंद केली जाते. या माहितीवरून रोजच्या रोज बाधित रूग्णांची यादी केली जाते. तसेच कोरोना नियंत्रणासाठी पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालकमंत्री तटकरे यांना दिली. तसेच शिक्षिकांच्या ट्रेसिंग टिमलाही पालकमंत्री तटकरे यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेतले. जे रुग्ण गृह विलगीकरणात असतात त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांना गृह निर्जंतुकीकरण, औषधांची माहिती देणे. तसेच 14 दिवस घराबाहेर न फिरण्याचा सल्लाही ही टिम देत असते.
याचबरोबर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये होणाऱ्या प्रस्तावित जंबो कोविड सेंटरची पहाणी केली. तेथे सुरू असलेल्या कामाजाची माहिती घेऊन सिडकोला लवकरात लवकर काम पुर्ण करुन महापालिकेला रुग्णालय ताब्यात द्यावे अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापक कैलास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.