नवी मुंबई

50 वर्षावरील कोव्हीड रूग्णांना महापालिका कोव्हीड सेंटर वा इतर रूग्णालयांत उपचारार्थ दाखल होण्याचा सल्ला देण्याचे फिजीशिअन यांना आवाहन

कोव्हीडच्या दुस-या लाटेतील रुग्णांच्या आरोग्य स्थितीचा तसेच महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर प्राप्त बेड्स उपलब्धतेच्या मागणीचा नियमित आढावा घेताना प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे गृह विलगीकरणात (Home Isolation) असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींची ऑक्सिजन पातळी घरीच झपाट्याने खालावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रूग्णांना ऑक्सिजन बेड्सची मधली पातळी ओलांडून थेट आयसीयू बेड्स अथवा व्हेंटिलेटरची गरज भासताना निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती रूग्णांच्या प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून या दुस-या लाटेत एकूण मृत्यूंपैकी 80 टक्के मृत्यू हे 50 वर्षावरील व्यक्तींचे झालेले आहेत. त्यामुळे फिजीशिअनमार्फत विशेषत्वाने 50 वर्षावरील आणि कोमॉर्बिड कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना घर मोठे असले तरी गृह विलगीकरणात थांबू नये तर महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये अथवा खाजगी रूग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेण्याचा सल्ला द्यावा व त्याचे महत्व पटवून द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फिजीशिअन यांना केले.

मागील रविवारी 300 हून अधिक खाजगी डॉक्टरांशी वेबसंवाद साधल्यानंतर आज आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील 96 नामांकित वरिष्ठ फिजीशिअन डॉक्टरांसोबत ऑनलाईन संवाद साधत गृह विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या आरोग्य स्थितीविषयी व याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याविषयी सविस्तर चर्चा केली.

या वेबसंवादाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉ. उदय जाधव, डॉ. अजय कुकरेजा व डॉ. अक्षय छल्लानी या नामांकीत फिजीशिअन यांनी गृह विलगीकरणातील रूग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन याविषयावर सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे नंतरच्या चर्चासत्रात विविध शंकांचे निरसनही केले. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होत्या.

नवी मुंबई महानगरपालिकेचे सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड सेंटर हे सर्वच दृष्टीने उत्तम असून तेथील व्यवस्थेची प्रशंसा त्याठिकाणी आरोग्य सेवेचा अनुभव घेतलेल्या विविध स्तरांतील आणि क्षेत्रांतील अनेक व्यक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्ती शक्यतो गृह विलगीकरणात राहण्यापेक्षा महानगरपालिकेच्या सिडको सेंटरसारख्या उत्तम आरोग्य सुविधेच्या ठिकाणी अथवा रूग्णाच्या इच्छेनुसार खाजगी रूग्णालय ठिकाणी दाखल होण्यास प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले.

गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधीत रूग्णासोबत थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, सॅनिटायझर व फेस मास्क असलाच पाहिजे तसेच अशा रूग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्टपणे सूचित करण्यात आले. गृह विलगीकरणातील रूग्णाने दररोज 4 ते 6 वेळा आपल्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये ‘6 मिनीट वॉक टेस्ट’ अत्यंत महत्वाची असून रूग्णाने विलगीकरण केलेल्या खोलीत 6 मिनिटे चालून त्यानंतर आपल्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासणे गरजेचे आहे. ही ऑक्सिजन पातळी 94 व त्यापेक्षा खाली असणे धोकादायक असून सातत्याने 100 डिग्री फॅरनाईट किवा त्यापेक्षा ताप असणे ही देखील धोकादायक बाब आहे. अशा रूग्णाने लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन महापालिका कोव्हीड केंद्रात अथवा खाजगी रूग्णालयात दाखल होणे आरोग्य स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. अशा विविध महत्वाच्या गोष्टींविषयी या वेबसंवादामध्ये माहितीचे आदान प्रदान झाले.

एखाद्या व्यक्तीस तापाची लक्षणे असल्यास त्याला औषधे देऊन थांबवून न ठेवता त्याची लगेच कोव्हीड टेस्ट करून घेणे ही योग्य उपचाराच्या दृष्टीने पुढील धोका टाळण्यासाठी अतिशय महत्वाची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

रूग्णांचा विश्वास असणारा त्यांचा नेहमीचा खाजगी डॉक्टर अथवा फिजीशिअन हे कोव्हीड विरोधी लढ्यातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांनी रूग्णशोधाच्या दृष्टीने कोव्हीड लक्षणे दिसणा-या व्यक्तींना कोव्हीड टेस्टसाठी प्रोत्साहीत करणे रूग्णाच्या आरोग्य हिताचे आहे हे लक्षात घेऊन तसेच रूग्णाचे वय व त्याच्या इतर आजारांची स्थिती लक्षात घेऊन कोरोना बाधिताच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे कायम लक्ष राहण्याकरिता गृह विलगीकरणाऐवजी प्रामुख्याने महापालिका कोव्हीड सेंटर अथवा खाजगी रूग्णालय असा संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय सूचविण्यासाठी पुढाकार घ्यावा त्याचप्रमाणे कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेसोबत असावे असे आवाहन आयु्क्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व फिजीशिअन यांना केले. त्यावर महानगरपालिकेच्या निर्णयात व सर्व कार्यात आपले संपूर्ण सहकार्य राहील असा विश्वास सर्व फिजीशिअन यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button