नवी मुंबई

ड्राइव्ह इन लसीकरणाव्दारे आता वाहनात बसल्या बसल्याच लसीकरण, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना दिलासा देणारा अभिनव उपक्रम

45 वर्षावरील नवी मुंबईकर नागरिकांना त्यातही विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सुलभ रितीने लस घेता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने “ड्राइव्ह इन लसीकरण” हा अभिनव उपक्रम सुरु केला असून आत्ता गाडीत बसल्या बसल्या आरामात लस घेता येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण केंद्रांच्या वाढीसोबतच नागरिकांना विनासायास लस घेता यावी याकरिता विविध सुविधा उपलब्ध करू देण्यात येत असून “ड्राइव्ह इन लसीकरण” हा त्याचाच एक भाग आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून सुरु होणा-या “ड्राइव्ह इन लसीकरणा”च्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी सुरुवातीपासूनच उत्साह दाखवत सीवूड नेरुळ येथील ग्रॅँड सेंट्रल मॉल व वाशी येथील इनॉर्बिट मॉल या दोन ठिकाणी आपापल्या वाहनांतून उपस्थिती दर्शविली.

सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी पार्किंगच्या जागेकडे जाण्याच्या प्रवेशव्दारावर प्रत्येक वाहनाला टोकन क्रमांक दिला जात होता व टोकन क्रमांकानुसार वाहनातील 45 वर्षावरील व्यक्तींची आधारकार्ड तपासून नोंदणी करण्यात येत होती. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना पार्कींगच्या विशिष्ट जागेत निरीक्षणासाठी अर्धा तास थांबविण्यात येत होते. या अर्ध्या तासाच्या निरीक्षण कालावधीत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात होते. त्याचप्रमाणे लस घेतलेल्या व्यक्तीस काही त्रास झाल्यास हॉर्न वाजवून इशारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

आजच्या ड्राइव्ह इन लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ग्रैँड सेंट्रल मॉलमध्ये श्रीम. प्रवीणा खटाव तसेच इनॉर्बिट मॉलमध्ये श्री. नरेंद्र सेनगर हे पहिले लस लाभार्थी ठरले. या दोन्ही ठिकाणी प्रथम येणा-या 50 वाहनांनातील 45 वर्षावरील लाभार्थी नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून 5 वाजेपर्यंत ग्रैँड सेंट्रल मॉलमध्ये 45 वर्षावरील 80 तसेच इनॉर्बिट मॉलमध्ये 66 अशाप्रकारे एकूण 146 नागरिकांनी कोव्हीड 19 लस घेतली आहे.

टोकन नंबर घेणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, लस घेणे व निरीक्षणासाठी अर्धा तास थांबणे ही सर्व प्रक्रिया आपल्या वाहनातून न उतरता बसल्या बसल्या होत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी संतोष व्यक्त केला.

आजपासून एपीएमसी मार्केट दाणाबाजार मध्येही विशेष कोव्हीड लसीकरण केंद्र कार्यान्वित

नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यादृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर संपूर्ण लसीकरण प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष देत असून दररोज संध्याकाळी होणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या वेबसंवादामध्ये याविषयीचा आढावा घेतला जात आहे. सध्याचा कडक उन्हाळा व आगामी पावसाळा कालावधी लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांबाहेर शेड टाकणे, त्याठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था व पंख्याची व्यवस्था करणे अशा विविध बाबींचाही आढावा घेतला जात आहे.

सध्या महानगरपालिकेची 4 रुग्णालये, सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे, वाशी सेक्टर 5 येथील जंम्बो लसीकरण केंद्र अशा 28 ठिकाणी लसीकरण सुरु असून आजपासून एपीएमसी मार्केटमध्ये दाणाबाजार येथेही विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. याशिवाय लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने लसीकरण केंद्र संख्येत भरीव वाढ करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button