संचारबंदीच्या काळात 6039 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून 24 लक्ष 83 हजाराहून अधिक दंड वसूली
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात 15 एप्रिल सकाळी 7 वाजल्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून कोरोनाची वाढती साखळी खंडीत करण्यासाठी संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आलेले आहे. तथापि तरीही संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या व कोव्हीड सुरक्षा त्रिसुत्रीचेही पालन न करता सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या नागरिकांविरुध्द महानगरपालिका व पोलीस यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांनी या कालावधीत 4520 नागरिक / दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत 18 लक्ष 65 हजार 200 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. यापैकी एपीएमसी मार्केटमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 5 अशा 15 पथकांनी 1543 व्यक्ती / दुकानदार यांच्याकडून 4 लक्ष 49 हजार 400 इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे.
या व्यतिरिक्त आठही विभाग कार्यालय क्षेत्रात कार्यरत विभागीय दक्षता पथकांनी 1519 व्यक्ती / दुकानदार यांच्याकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन कारवाईपोटी रुपये 6 लक्ष 18 हजार 100 इतका दंड वसूल केलेला आहे.
अशाप्रकारे संचारबंदीच्या कालावधीत 2 मे पर्यंत एकूण 24 लक्ष 83 हजार 400 रक्कमेचा दंड 6039 व्यक्ती / दुकानदार यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले म्हणून वसूल करण्यात आलेला आहे.
याशिवाय संचारबंदी काळात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून 50 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये 93 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 228 नागरिकांची त्याच जागी ॲन्टिजन टेस्ट करण्यात आलेली आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले संचारबंदीचे निर्बंध हे सर्वांच्याच आरोग्य हिताकरिता लागू करण्यात आलेले असून काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असून यामधून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना समज मिळावी याकरिता दंडात्मक कारवाईसह गुन्हा नोंद व ॲन्टिजन टेस्टींग करण्यात येत आहे. यामागील महानगरपालिका व पोलीस विभागाची भूमिका लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व जीवनावश्यक गोष्टींकरिता घराबाहेर पडल्यास मास्क, सुरक्षित अंतर व वारंवार होत धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे या सुरक्षा त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.