रेमडेसिविरचा गैरवापरावर राहणार आता विशेष भरारी पथकांची नजर
सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा जाणवत असून काही रूग्णालयांकडून इंजेक्शनचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमातून प्राप्त होत आहेत. रेमडेसिविरच्या मागणी, वितरण व वापराबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच रेमडेसिविर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा केला जात आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयाम्रार्फत उपलब्ध करून घेणे ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून ज्यांना गरज आहे अशाच रूग्णांसाठी त्याचा वापर केला जावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष आदेशाव्दारे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन मागणीची औषधचिठ्ठी (Prescription) रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये असेही आदेशात निर्देशित करण्यात आलेले आहे.
तथापि काही रूग्णालयांकडून रेम़डेसिविरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने आयुक्तांनी रेमडेसिविरचा गैरवापर रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष भरारी पथकाची स्थापना केलेली आहे.
हे भरारी पथक प्राप्त तक्रारीनुसार अथवा स्वयं नियोजनानुसार रूग्णालयांस भेट देऊन रूग्णालयास पुरवठा करण्यात आलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व वापर यांचा ताळमेळ बसतोय काय याची तपासणी करेल. यामध्ये रेमडेसिविर मागणी केलेल्या रूग्णाकरिताच वापरण्यात आलेले असल्याची खात्री करण्यात येईल तसेच ते ज्या रूग्णाकरिता वापरलेले आहे त्याचे नाव रिकाम्या बाटलीवर लिहिले आहे काय याचीही तपासणी करण्यात येईल. सदर रूग्णालयांनी वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कुप्या जतन करून ठेवावयाच्या असून त्याचीही पडताळणी करण्यात येईल. याशिवाय त्या रूग्णालयाकरिता देण्यात आलेला रेमडेसिविरचा साठा हा त्या रूग्णालयातील रूग्णांकरिताच वापरलेले आहे याचीही पडताळणी भरारी पथक करेल.
रेमडेसिविरची आवश्यकता असणा-या कोव्हीड रूग्णांना विहित वेळेत रेमडेसिविर मिळावे यादृष्टीने आवश्यक नियोजन शासन स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जात आहे. त्यातूनही काही रूग्णालयांमार्फत रेमडेसिविरचा गैरवापर होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात घेत रेमडेसिविरच्या वापराबाबत रूग्णालयांना आदेशित करतानाच त्याचा गैरवापर रोखण्याकडेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. त्यासाठी उपआयुक्त दर्जाच्या अधिका-याच्या नियंत्रणाखाली विशेष भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रेमडेसिविरच्या वापरावर या भरारी पथकाचे काटेकोर लक्ष असणार आहे.