कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन व्हावे याकरिता फेरीवाल्यांचे मोकळ्या जागांमध्ये स्थलांतरण
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 01 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने नागरिकांची विशेषत्वाने भाजीपाला, फळे, मासळी खरेदी करण्यासाठी खरेदीच्या मर्यादेत वेळेत मार्केटमध्ये गर्दी होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे खरेदीसाठी गर्दी होऊ शकतील अशी बाजाराची संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन त्यांचे मोकळ्या जागेत तात्पुरते स्थलांतरण करणे विषयी सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात दिवाळेगांव येथील 48 भाजीपाला व मासळी विक्रेते यांना तेथून जवळच असलेल्या ओम साईराम चॅरिटेबल ट्रस्टच्या मैदानात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शाहबाज बेलापूर येथील 65 विक्रेत्यांना सेक्टर 15 सी.बी.डी. बेलापूर येथील मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. तसेच सेक्टर 3 येथील मार्केट हे त्या जवळील राजीव गांधी क्रीडा संकुलाशेजारच्या मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
संचारबंदीच्या काळात नागरिकांची व विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये तसेच संचारबंदीचा कोरोना साखळी खंडीत करण्याच उद्देश सफल व्हावा या दोन्ही गोष्टींची नवी मुंबई महानगरपालिका काळजी घेत असून नागरिकांनी संचारबंदीच्या तसेच कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.