नवी मुंबई

ऑक्सिजन पुरवठ्यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रूम कार्यान्वित, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबविण्याचेही नियोजन

संपूर्ण राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना रूग्णांकरिता ऑक्सिजनचीही वाढती गरज लक्षात घेऊन ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने आधीपासूनच नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरूवात केलेली आहे. नाशिकमध्ये घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन सुविधा यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला होता. याशिवाय आयुक्तांमार्फत दररोज नियमितपणे सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी होत असलेल्या वेबसंवादामध्ये रूग्णालयीन सुविधानिहाय ऑक्सिजन साठ्याचाही आढावा घेतला जात आहे.

सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटर, नेरूळ येथील डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालय व एमजीएम रूग्णालय कामोठे या ठिकाणी आयसीयू व व्हेटिलेटर्स बेड्सची सुविधा कार्यान्वित आहे. याशिवाय वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेटर, राधास्वामी सत्संग व एक्पोर्ट हाऊस याठिकाणी असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर्समध्येही ऑक्सिजन बेड्सकरिता ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रात 26 खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड रूग्णांवर उपचार केले जात असून तेथील ऑक्सिजन पुरवठ्यावरही महानगरपालिकेमार्फत कायम लक्ष ठेवले जात आहे.

सध्या सर्वच ठिकाणाहून ऑक्सिजनची मागणी वाढली असून ऑक्सिजनअभावी रूग्णांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने तत्पर कार्यवाहीकरिता महानगरपालिका मुख्यालयात ‘ऑक्सिजन वॉर रूम’ कार्यान्वित करण्यात आलेली आहे. उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली 6 जणांची टीम ऑक्सिजन वॉर रूम मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून येथून सकाळी 7 ते 11 या वेळेत महानगरपालिका व खाजगी अशा सर्व कोव्हीड रूग्णालयीन सुविधेतील ऑक्सिजन साठ्याचा दर 3 तासांनी आढावा घेतला जात आहे. तसेच कुठे अडचण असल्यास उपलब्ध ऑक्सिजन साठ्याची माहिती घेऊन ती दूर करण्यासाठी तत्परतेने आवश्यक उपाययोजना केली जात आहे.

उत्पादकाकडून एमआयडीसी मध्ये टँकरमधून येणारा ऑक्सिजनचा साठा तेथील पुरवठादार कंपन्यांच्या सिलिंडरमध्ये जमा केला जातो व त्याचे वितरण केले जाते. त्याठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी 24 x 7 कार्यरत असून त्यांच्यामार्फत ऑक्सिजनचा साठा आल्यानंतर तो महानगरपालिकेच्या सिलेंडर्समध्ये भरून घेणे व नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयाचे आलेले सिलेंडर्सही प्राधान्याने भरून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे काम केले जाते.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रत्येक कोव्हीड रूग्णालयीन सुविधांच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी संबंधित रूग्णालयामध्ये किमान 24 तास पुरेल एवढा साठा कायम उपलब्ध करून ठेवण्याच्या दृष्टीने रूग्णालयीन व्यवस्थापनाशी नियमित संपर्क ठेवावा व त्यात अडचणी येत असल्यास ऑक्सिजन वॉर रूमशी संपर्क साधून ऑक्सिजनची पूर्तता करून घेईपर्यंत पाठपुरावा करावा असे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचेमार्फत सर्व रूग्णालयीन नोडल अधिकारी यांना देण्यात आले आहेत. शिवाय याचा दैनंदिन आढावा दररोज संध्याकाळच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आयुक्तांमार्फत घेतला जात आहे.

ऑक्सिजन साठा नियंत्रक नोडल अधिकारी ऑक्सिजन पुरवठादारांशी नियमित संपर्कात राहून व त्यांच्या कंपनीस प्रत्यक्ष भेट देऊन शासनाची मदत घेत त्या ठिकाणाहून आवश्यक टँकर भरून घेतले जातील अशा प्रकारे नियोजन केले जात आहे.

याशिवाय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता तत्परतेने पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटही केले जात आहे. नवी मुंबईतील कोव्हीड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरिता महानगरपालिका अत्यंत जागरूकतेने काम करीत असून ऑक्सिजन वॉर रूमव्दारे तसेच ऑक्सिजन पुरवठादाराच्या कंपनीमध्येच महानगरपालिकेची पथके तैनात करून रूग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ दिली जाणार नाही असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आश्वासित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp करा