नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 2 लाखाहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला कोव्हीड लसीचा दुसरा डोस
कोव्हीडची लस अत्यंत सुरक्षित असून ती प्रत्येक लाभार्थ्याने विनाविलंब घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतर कोणाला मोठ्या प्रमाणात त्रास झाला असे एकही उदाहरण नसून ही लस कोव्हीडपासून सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे कोणाला कोरोना विषाणूची बाधा झाली तरी लस घेतलेली असल्यास कोरानामुळे होणा-या शारीरिक हानीची तीव्रता कमी होते. म्हणून प्रत्येक लाभार्थ्याने त्वरित लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सुलभ रितीने लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता महानगरपालिकेने अगदी सुरूवातीपासूनच सुयोग्य नियोजन केले असून महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, तुर्भे येथील रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो लसीकरण केंद्र व 23 नागरी आरोग्य केंद्रे अशा 28 ठिकाणी विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 21 खाजगी रुग्णालयांमध्येही रू.250/- प्रतिडोस या शासकीय दराने लसीकरण केले जात आहे. अशाप्रकारे महापालिका क्षेत्रात 49 लसीकरण केंद्रांवर कोव्हीड 19 लसीकरण होत आहे.
25 एप्रिलपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील 2 लाख 3 हजार 198 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
महापालिका क्षेत्रात झालेल्या लसीकरणाचा तपशील:
पहिला टप्पा – डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी—-पहिला डोस 27653—-दुसरा डोस 16059
दुसरा टप्पा – पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे—-पहिला डोस 21322—- दुसरा डोस 8607
तिसरा टप्पा – ज्येष्ठ नागरिक—-पहिला डोस 60518—-दुसरा डोस 16879
45 वर्षावरील कोमॉर्बीड व्यक्ती—-पहिला डोस 10277—-दुसरा डोस 6113
45 ते 60 वयाचे नागरिक—-पहिला डोस 83403—-
एकूण 203198
1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याविषयी सरकारमार्फत घोषित करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्याविषयीच्या नियोजनाबाबत आयुक्तांनी सविस्तर आढावा घेत आरोग्य विभागास निर्देश दिलेले आहेत. यामध्ये वाशीतील जम्बो लसीकरण केंद्रांवर सध्या सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत सध्या सुरू असलेल्या 4 लसीकरण बूथमध्ये तसेच इतरही काही नवीन ठिकाणी केंद्रे सुरू करून केंद्रसंख्येत वाढ करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांचीही केंद्रावर विशेष काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने लसीकरणासाठी सुयोग्य व्यवस्था केलेली असून लाभार्थी 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर आजच जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.