ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केटमध्ये रात्री 12 ते 5 कोव्हीडच्या अनुषंगाने धडक मोहिम
कोरोना प्रादुर्भावाचे जोखमीचे क्षेत्र असणा-या ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता महानगरपालिका आणि पोलीस यांचेमार्फत ए.पी.एम.सी. प्रशासनाला उचित कार्यवाही करणेबाबत वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पाचही मार्केटमध्ये मार्केटच्या वेळांनुसार कोव्हीड टेस्टींग सेंटर्स सुरु आहेत.
ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कोव्हीड नियमांचे पालन व्हावे याकडे बारकाईने लक्ष देण्यात येत असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देशानुसार रात्री 12 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने भाजीपाला मार्केमध्ये धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण रुपये 62 हजार 300 इतका दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये 115 व्यक्तींकडून मास्क न वापरल्याबद्दल 57 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणा-या 24 व्यक्तींकडून 4 हजार 800 इतका दंड वसूल करण्यात आला.
उपआयुक्त श्री. राजेश कानडे व तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सुबोध ठाणेकर यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व ए.पी.एम.सी. मार्केट करीता नियुक्त विशेष दक्षता पथकांमधील 48 कर्मचारी व 14 पोलीस यांच्या सहभागाने ही धडक मोहिम पार पडली.
कोपरखैरण्यातील 2 दुकानदारांकडून प्रत्येकी 10 हजार दंड वसूल
कोपरखैरणे विभागात सहाय्यक आयुक्त श्री. अशोक मढवी आणि विभागातील कर्मचा-यांनी ब्रेक द चेन आदेशानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक सेवेतील दुकाने कोव्हीडच्या नियमांचे पालन करून सुरु असतील याकडे बारकाईने लक्ष दिले. यामध्ये सेक्टर 12 ई व सेक्टर 11 येथील 2 दुकानांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी रुपये 10 हजार याप्रमाणे एकूण रुपये 20 हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ब्रेक द चेन आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करणे प्रत्येकाने गरजेचे असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.